Join us  

जे.जे.रुग्णालयाला येणार झळाळी; सुसज्ज वॉर्डसह सेल्फी पॉइंट, म्युझियम उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 10:38 AM

राज्यासह देशाच्या पटलावर रुग्णसेवा देणारे जे. जे. रुग्णालय आता लवकरच कात टाकणार आहे.

मुंबई : राज्यासह देशाच्या पटलावर रुग्णसेवा देणारे जे. जे. रुग्णालय आता लवकरच कात टाकणार आहे. मागील ६३ वर्षांपासूनच रुग्णसेवेचे व्रत स्वीकारलेल्या या रुग्णालयात आता पंचतारांकित सेवांसह सुसज्ज वॉर्डसह सेल्फी पॉइंट, म्युझियम उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आता या रुग्णालयात रुग्णांना खासगी रुग्णालयात सेवा घेतल्याचा अनुभव मिळणार आहे.

जे. जे. रुग्णालयाच्या अद्ययावतीकरण आणि नूतनीकरण प्रकल्पात नुकतेच रुग्णालयातील हृदयरोग विभागातील कक्षात भिंतीचे पापुद्रे, स्लॅब, पाणीगळतीची कामे करण्यात आली. तसेच, या कक्षातील सेवाचे अत्याधुनिकीकरण करण्यात आले आहे. राज्य शासनाने रुग्णालयातील तीन शस्त्रक्रियागृहांचेही नूतनीकरण करण्याचे निश्चित केले आहे. या नूतनीकरणासाठी ७५ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली आहे. 

वैद्यकीय शिक्षण, संशोधनावर आधारित म्युझियम :

जे. जे. रुग्णालय येत्या मे २०२४ मध्ये १८० व्या वर्षात पदार्पण करत असून, १८४५ सालची महाविद्यालयाची इमारत आजही अस्तित्वात आहे, त्या ठिकाणी देशातील पहिले वैद्यकीय शिक्षण व संशोधनावर आधारित म्युझियम तयार करण्यात येणार आहे. हे म्युझियम १८४५ साली बांधण्यात आलेल्या ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हेरिटेज बिल्डिंगमध्ये बनविण्यात येणार आहे. म्युझियम तयार झाल्यावर आधुनिक वैद्यकशास्त्राचा गौरवशाली इतिहास हा विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य जनतेला पाहता येणार आहे.

या दिग्गजांचा उलगडणार इतिहास :

ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुग्णालयात शिक्षण घेणाऱ्या १८४५ च्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थी तसेच सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असलेले डॉक्टर्स डॉ. भाऊ दाजी लाड, संस्कृतविद्वान डॉ. आत्माराम पांडुरंग, डॉ. सखाराम अर्जुन, तसेच पुढील वर्षांमध्ये ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारे डॉ. विठ्ठल शिरोडकर, डॉ. खान अब्दुल जब्बार खान, डॉ. जीवराज मेहता, डॉ. एस. जे. मेहता, डॉ. द्वारकानाथ कोटनीस, डॉ. नोशरर एच. ॲटीया, डॉ. बोमसी वाडीया यांचा इतिहास तसेच डॉ. रुखमाबाई राऊत फिजिशियन आणि पहिल्या प्रॅक्टिस करणाऱ्या महिला डॉक्टर, डॉ. फारुख उडवाडीया फिजिशियन आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त नामांकित डॉक्टर या सर्वांचा इतिहास तसेच आधुनिक वैद्यकशास्त्राच्या सर्व बाबींचा समावेश या म्युझियममध्ये असणार आहे.

टॅग्स :मुंबईजे. जे. रुग्णालय