Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: जेनीचा काळ आला होता, पण..., बिबट्याच्या जबड्यातून बॉम्ब स्क्वॉडच्या श्वानाची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 12:55 IST

Mumbai: मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे (बीडीडीएस) प्रभारी उपनिरीक्षक विनोद बल्लाळ यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आरे कॉलनीत एका २.५ वर्षांच्या प्रशिक्षित बेल्जियन शेफर्डला बिबट्याच्या जबड्यातून वाचवले.

मुंबई - मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे (बीडीडीएस) प्रभारी उपनिरीक्षक विनोद बल्लाळ यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आरे कॉलनीत एका २.५ वर्षांच्या प्रशिक्षित बेल्जियन शेफर्डला बिबट्याच्या जबड्यातून वाचवले. त्यांच्या या अतुलनीय शौर्यामुळे मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांची प्रशंसा करण्यात येत आहे.

आरे मिल्क कॉलनी येथे विनोद बल्लाळ यांनी जेनी या प्रशिक्षित अशा बेल्जियन शेफर्ड जातीच्या श्वानाला फेरफटका मारण्यासाठी आणि नैसर्गिक विधीसाठी २ जून रोजी नेले होते. बल्लाळ यांच्या म्हणण्यानुसार, रात्री ९ च्या सुमारास ते जेनीला कॅम्पसमध्ये वॉकसाठी घेऊन गेले तेव्हा  तितक्यात एक मोठी मांजर कुठून तरी बाहेर आली आणि तिने जेनीवर झडप मारली. अंधारामुळे सुरुवातीला तो बिबट्या आहे की अन्य दुसरा प्राणी हे बल्लाळांना समजले नाही. मात्र जेनी ओरडत असल्याने तिला वाचविण्यासाठी त्यांनी हल्लेखोर प्राण्यावर उडी मारली. यामुळे बिबट्याची जेनीच्या मानेवरील पकड ढिली झाली आणि जोरात गुरगुरत तो मागे सरकला. 

बल्लाळ यांना फक्त बिबट्याचे भयंकर डोळे दिसत होते. जो त्या दोघांवर हल्ला करण्याच्या तयारीत उभा होता. बल्लाळ यांना तो बिबट्या असल्याचे तेव्हा कळले जेव्हा तो त्यांच्यापासून काही फुटांवरून जोरात ओरडू लागला. बिबट्याच्या आवाजाने काही वेळासाठी बल्लाळ घाबरले मात्र नंतर त्यांनी पुन्हा धैर्य एकवटत त्याला हाकलून देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बिबट्याने तोंड उघडले आणि त्यांच्यावर हल्ला करणार इतक्यात त्याच्यापेक्षाही मोठ्या आवाजात ओरडून बल्लाळ यांनी त्यालाच घाबरवले. अखेर बल्लाळचा मोठा आवाज ऐकून बिबट्या जंगलात पळून गेला. या संघर्षात बल्लाळसुद्धा जखमी झाले कारण बिबट्याने त्यांच्या पोटावर पंजा मारला होता. जेनीच्या मानेभोवती बिबट्याने चावा घेतला होता. या जखमांमुळे अंधेरीतील रुग्णालयात दाखल केले गेले. जिथे उपचार झाल्यानंतर ती पुन्हा २५ जूनला कर्तव्यावर परतली.

 

टॅग्स :मुंबई