Join us  

मुंबईला पुन्हा पावसाने झोडपले; रात्री उशिरापर्यंत जोर‘धार’ कायम असल्याने नागरिकांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 1:26 AM

कमी दृश्यमानतेमुळे लोकलला १५ ते २० मिनिटे लेटमार्क

मुंबई : बुधवारी जोरदार कोसळून मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत केलेल्या पावसाने गुरुवारनंतर काहीशी उसंत घेतली होती. त्यानंतर शनिवारी सकाळपासून दुपारपर्यंत बऱ्यापैकी उघडीप घेतलेल्या पावसाने दुपारी दोननंतर रौद्ररूप धारण केले. कुलाब्यापासून मुलुंड आणि दहिसरपर्यंत ठिकठिकाणी कोसळलेल्या जोर‘धारे’ने मुंबईला झोडपून काढले. दुपारी २ ते ३ या वेळेत कोसळलेल्या मुसळधार पावसाचा वेग तीनच्या सुमारास किंचित कमी झाला. परिणामी पाऊस थांबेल, असे वाटत असतानाच पावसाने पुन्हा वेग पकडल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली.

मुंबई शहर, उपनगराला बुधवारी झोडपल्यानंतर गुरुवासह शुक्रवारी पावसाने अधूनमधून बरसत विश्रांती घेतली. काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. शनिवारी सकाळी काही ठिकाणी दाटून आलेल्या ढगांमुळे मोठ्या सरी कोसळतील, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र सकाळ कोरडी गेली. काही ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ सुरू होता.

दुपारनंतर अचानक आलेल्या मोठ्या पावसाने मुंबईकरांनी आडोशाचा आधार घेतला. पावसाने आपला सलगपणा सायंकाळसह रात्री उशिरापर्यंत कायम ठेवल्याने मुंबईकरांचे हाल झाले.

अखेर शोधकार्य थांबवलेमरिन ड्राइव्ह येथील झेवियर मॉलजवळ समुद्रात बुडालेल्या व्यक्तीस शोधण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. मात्र त्याचा शोध लागला नाही. परिणामी, शोधकार्य थांबविण्यात आले.

कमी दृश्यमानतेमुळे लोकलला १५ ते २० मिनिटे लेटमार्कमुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने मध्य रेल्वे मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे तसेच हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ५ ते १० मिनिटे उशिरानेधावत होत्या.

हवामानात धुके वाढल्याने रेल्वे मार्गावरील दृश्यमानता कमी होते. परिणामी, मोटरमनला लोकल चालविणे कठीण होते. त्यामुळे मोटरमनकडून लोकलचा वेग कमी करून लोकल चालविण्यात येत होत्या, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, लोकल उशिराने धावत असल्याने प्रत्येक स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट, दादर, वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, जोगेश्वरी, बोरीवली या स्थानकांवर गर्दी प्रचंड वाढली होती.

कुठे तुंबले पाणीमिलन सब-वे, सांताक्रुझहिंदमाता, परळवीरा देसाई रोडशीतल सिग्नल, कुर्लाश्रेयस सिग्नल, घाटकोपरगांधी मार्केट, माटुंगासायन रोड

टॅग्स :मुंबईपाऊसलोकल