Join us  

मुंबईत घरांची रोज ८५० कोटींची उलाढाल, यंदा डिसेंबरमध्ये तिप्पट व्यवहारांची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 3:48 AM

महिनाअखेरपर्यंत व्यवहारांची संख्या १५ हजारांचा तर उलाढालीचा आकडा २५ हजार कोटींचा पल्ला पार करून विक्रम प्रस्थापित होईल अशी चिन्हे आहेत.

मुंबई :  गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबई शहरात ६,४३३ मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी झाली होती. यंदा पहिल्या पंधरवड्यातील नोंदणीने तो टप्पा ओलांडला असून १७ डिसेंबरपर्यंत नोंदणी झालेल्या व्यवहारांची संख्या ८,६१२ आहे. दररोज सरासरी ८५० कोटी रुपये किमतीच्या घरांची खरेदी-विक्री होत आहे. महिनाअखेरपर्यंत व्यवहारांची संख्या १५ हजारांचा तर उलाढालीचा आकडा २५ हजार कोटींचा पल्ला पार करून विक्रम प्रस्थापित होईल अशी चिन्हे आहेत.कोरोना संक्रमणाच्या संकटामुळे मुंबईतील घरांच्या खरेदी-विक्री व्यवहारांना ग्रहण लागले होते. मात्र, राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात केलेली कपात आणि विकासकांनी दिलेल्या सवलतींमुळे ते सुटले. गेल्या साडेतीन महिन्यांत शहरांत ३१ हजार ४३८ मालमत्तांचे व्यवहार नोंदविले गेले असून सरकारला त्यातून ९६८ कोटींचा महसूल प्राप्त झाला.डिसेंबर महिन्यानंतर मुद्रांक शुल्कातील कपात तीन टक्क्यांवरून दोन टक्क्यांवर येणार आहे. त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त व्यवहार नोंदविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यामुळेच गेल्या डिसेंबरपेक्षा यंदा तिप्पट व्यवहारांची नोंद होईल अशी चिन्हे आहेत.१७ दिवसांतच १३ हजार ४५० कोटींचे व्यवहार २०१९ साली डिसेंबर महिन्यात दररोज ३४९ कोटी रुपयांच्या मालमत्तांचे व्यवहार नोंदविले जात होते. यंदा ती उलाढाल ८५० कोटींवर झेपावली आहे. गेल्या वर्षी संपूर्ण महिन्यात १०,८४० कोटींचे व्यवहार झाले होते. यंदा पहिल्या १७ दिवसांतच १३ हजार ४५० कोटींचे व्यवहार नोंदविले गेले. गेल्या वर्षी मुंबईत विक्री झालेल्या मालमत्तांची सरासरी किंमत १ कोटी ६८ लाख रुपये होती. यंदा ही किंमत १ कोटी ५६ लाख झाली आहे. २०१९ मध्ये डिसेंबर महिन्यात दररोज २०७ मालमत्तांची खरेदी-विक्री झाली होती. यंदा ती तब्बल ५०६ इतकी वाढली आहे.

टॅग्स :बांधकाम उद्योग