Join us

लोकल चुकल्याने रात्र काढावी लागते स्थानकातच, मध्य रेल्वेवरील कामाचा प्रवाशांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 14:31 IST

Mumbai Local:  मध्य रेल्वेमार्गावर काही कामे सुरू असून, त्याचा हार्बर रेल्वेच्या प्रवासावरही होत आहे. मध्य रेल्वेच्या गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशाचे पुढील प्रवासाचे गणित बिघडत आहे.  

मुंबई :  मध्य रेल्वेमार्गावर काही कामे सुरू असून, त्याचा हार्बर रेल्वेच्या प्रवासावरही होत आहे. मध्य रेल्वेच्या गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशाचे पुढील प्रवासाचे गणित बिघडत आहे.  हार्बर मार्गावरील त्यांची शेवटची लोकल चुकत असल्याने रात्र स्थानकातच बसून काढावी लागत आहे.

गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत यंदा संध्याकाळच्या वक्तशीरपणाच्या वेळेत दोन टक्क्यांनी घट झाली आहे. मध्य रेल्वेचा पसारा मोठा आहे. सीएसएमटी ते कर्जत, खोपोली, कसारा, आसनगाव, पनवेल, ठाणे ते तुर्भे, नेरूळ ते खारकोपरदरम्यान लोकल धावतात.  मध्य रेल्वेवरून दिवसाला सुमारे ३६ लाख प्रवासी प्रवास करतात.  सकाळच्या गर्दीच्या वेळी  कल्याण, बदलापूरसह ठाणे, नवी मुंबई, पुणे  आणि उपनगरातून मुंबईत कामानिमित्त लाखोजण येतात. तर संध्याकाळी घरी जाण्यासाठी पुन्हा लोकलनेच प्रवास करतात. पण राहण्यास नवी मुंबई, पनवेल या ठिकाणी असलेले आणि कामासाठी दादर, परळ, लालबाग, वरळी येथे असलेले प्रवासी दादरमार्गे कुर्ला येथे जाऊन हार्बर मार्गावरील शेवटची लोकल पकडून घरी जातात; मध्य रेल्वेमार्गावरील गाड्यांनाच उशीर होत असल्याने शेवटची पनवेलची गाडी मिळत नाही. त्यामुळे त्यांना वाशी स्थानकापर्यंत जाता येते. तेथून खासगी वाहनाचा भुर्दंड सोसावा लागतो किंवा तिथेच मुक्काम करून पहाटेच्या पहिल्या लोकलने घर गाठावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

माटुंगा-सायनदरम्यान ट्रॅक स्लीपर बदलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागात वेगनिर्बंध लावण्यात आले असून काही गाड्यांना उशीर होत आहे. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल. - शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वेकेंद्र सरकार