मुंबई : दीर्घ काळ प्रलंबित मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्राधान्य देण्याबरोबरच राज्यात रस्त्यांचे जाळे विकसित करून ग्रामीण भागांना शहरांशी जोडले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
मंगळवारी मंत्रालयातील आपल्या सहाव्या मजल्यावरील दालनात सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार असून, चुकीच्या पद्धतीने काम होत असेल किंवा जमीन हस्तांतरणात अडचणी येत असतील तर त्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे मंत्री भोसले म्हणाले.
मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चापदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या दालनात विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला. येत्या एक - दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर विभागाच्या १०० दिवसांच्या उद्दिष्टांबाबतही बैठक होणार आहे.