मुंबई गारठली, किमान तापमान १४.८ अंश सेल्सिअस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:27 IST2021-02-05T04:27:42+5:302021-02-05T04:27:42+5:30
चालू हंगामातील नीचांक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत शुक्रवारी १४.८ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नाेंद झाली. चालू ...

मुंबई गारठली, किमान तापमान १४.८ अंश सेल्सिअस
चालू हंगामातील नीचांक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत शुक्रवारी १४.८ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नाेंद झाली. चालू हंगामातील आतापर्यंतचा हा नीचांक आहे. उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतही किमान तापमान खाली उतरले असून, ते १२ अशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सांताक्रुझ येथील वेधशाळेत चालू हंगामातील नीचांक किमान तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे गार वारे वाहत असून, पुढील २४ तास असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे.
राज्याचा विचार केल्यास उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमान आणखी खाली घसरले आहे. ठाणे, जळगाव, जेऊर, सातारा, नाशिक, बारामती, डहाणू, मालेगाव, पुणे येथील किमान तापमानातही घट झाली असून, ते १२ ते १५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दरम्यान, देशभरात किमान तापमान खाली उतरले असून, शुक्रवारी गुजरात येथील नालियामध्ये किमान तापमान अवघे ४.३ अंश सेल्सिअस हाेते.