मुंबई अग्निशमन दलावर शोककळा

By Admin | Updated: May 11, 2015 03:51 IST2015-05-11T03:51:18+5:302015-05-11T03:51:18+5:30

काळबादेवीतील भीषण आगीत शहीद झालेल्या संजय राणे आणि महेंद्र देसाई या दोन्ही अधिकाऱ्यांना मुंबई अग्निशमन दलाने आज अखेरचा निरोप दिला.

Mumbai fire brigade mourns | मुंबई अग्निशमन दलावर शोककळा

मुंबई अग्निशमन दलावर शोककळा

मुंबई : काळबादेवीतील भीषण आगीत शहीद झालेल्या संजय राणे आणि महेंद्र देसाई या दोन्ही अधिकाऱ्यांना मुंबई अग्निशमन दलाने आज अखेरचा निरोप दिला. चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये दोन्ही शहिदांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सकाळी साडेदहा वाजता दोन्ही शहिदांचे पार्थिव मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्र असलेल्या भायखळा केंद्रात आणण्यात आले. या वेळी अंत्यदर्शन घेताना सर्वच अधिकारी आणि जवानांचे डोळे पाणावले होते. राणे आणि देसाई या दोन्हीही कुटुंबांना या वेळी शोक अनावर झाला होता. दलाचे जवान शोकाकुल कुटुंबीयांना धीर देत होते. मात्र त्यांचे सांत्वन करण्यात कोणालाही यश आले नाही. देसाई यांची पत्नी तर त्यांच्या पार्थिवामागे धावत गेली. या वीरपत्नीला सावरण्याचे धाडस कोणत्याही जवानात दिसले नाही. त्यांच्या आक्रोशातून त्यांच्यावर कोसळलेल्या दु:खाच्या डोंगराची कल्पना येत होती.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या फ्लॅगमध्ये लपेटून दोन्ही शहिदांना मानवंदना देण्यात आली. शिवाय पार्थिवावर दलाचा युनिफॉर्म ठेवून दलाने दोन्ही अधिकाऱ्यांना साश्रू नयनांनी श्रद्धांजली वाहिली. या वेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, आयुक्त अजेय मेहता यांनीही पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली वाहिली. कालपर्यंत सोबत असलेला सहकारी आज नाही, या गोष्टीवर कोणत्याही जवानाचा विश्वास बसत नव्हता. नागरिकांची जीव आणि मालमत्ता वाचवताना ज्या दोन दिग्गज अधिकाऱ्यांना आहुती द्यावी लागली, ती कधीही भरून काढता येणार नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.

‘पप्पा, तुम्हाला किती भाजलंय!’
आगीत होरपळल्याने देसाई यांचा चेहरा झाकून ठेवण्यात आला होता. अंत्यदर्शन घेणाऱ्या शिवानीने वडिलांचा चेहरा एकदा तरी पाहू देण्याची विनंती केली. मात्र हतबल जवानांनी देसाई यांचा चेहरा जास्तच भाजल्याने तो तिला दाखवण्यास असमर्थता दर्शवली. त्या वेळी ‘पप्पा.. तुम्हाला किती भाजलंय! पाहू द्याना!’ अशी हाक देत शिवानी वडिलांचे अंत्यदर्शन करू देण्याची विनंती करीत होती.

त्यांना वाचवू शकलो नाही, याची खंत!
आगीवर नियंत्रण मिळवताना उप प्रमुख अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर आणि प्रभारी उप प्रमुख अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन त्यांच्यासोबत राजेंद्र चौधरी हे एक अधिकारी होते. रहिवाशांची सुखरूप सुटका केल्यानंतर तळमजल्याला घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. व्यूहरचना करीत असतानाच तिसऱ्या, दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यावरील स्लॅब थेट तळमजल्यावर कोसळला. त्यामुळे नेसरीकर बाहेर फेकले गेले, तर अमीन मात्र स्लॅबखाली अडकले आणि गंभीर जखमी झाले. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने अमीन यांना बाहेर काढावे लागले. डोळ्यांसमोर सहकारी मदतीसाठी हाक मारत असतानाही तत्काळ कोणतीही मदत करता आली नाही, अशी खंत चौधरी यांनी व्यक्त केली.

कठीण परीक्षेचा काळ : राणे आणि देसाई या दोन्ही अधिकाऱ्यांच्या मुलांच्या महत्त्वाच्या परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत. त्यात देसाई यांची मुलगी शिवानीची २८ मेपासून परीक्षा आहे. राणे यांचा मुलगा राज याची काहीच दिवसांनंतर इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा आहे; तर मुलगी गौरी हिची परीक्षा सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही शहिदांच्या मुलांची खऱ्या अर्थाने कठीण परीक्षा असल्याचे म्हणता येईल.

आत्मविश्वास ढासळू देऊ नका
मुंबईतील महापूर असो, वा दहशतवादी हल्ला प्रत्येक वेळी खांद्याला खांदा लावून देसाई आणि राणे यांच्यासोबत काम केल्याची प्रतिक्रिया उप प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिली. त्यांच्या जाण्याने दलाच्या वरची फळी ढासळली आहे. मात्र त्यामुळे इतर जवानांनी खचून न जाता आत्मविश्वासाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. शहीद अधिकाऱ्यांच्या शूर आणि वीरतेचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या कुटुंबाला आवश्यक ती मदत करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

राज्यपालांनी व्यक्त केले तीव्र दु:ख
राज्यपाल विद्यासागर राव यांनी काळबादेवी येथे भीषण आगीत झालेल्या जीवित हानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. आगीच्या वेळी कर्तव्य बजावित असताना मुंबई अग्निशमन दलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समजून अतिशय वाईट वाटल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेले मुंबईचे मुख्य अग्निशमन अधिकारी, उप-मुख्य अग्निशमन अधिकारी तसेच इतर सर्व अग्निशमन दलाच्या जवानांना लवकर बरे वाटावे, यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली आहे.

‘वीरपत्नीला पालिका नोकरी देणार का?’
देसाई यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मुलगा नुकताच दहावीत गेला आहे. तर मुलगी एमबीबीएसच्या पहिल्याच वर्षाला आहे. पत्नी गृहिणी असल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळल्याची माहिती देसाई यांचे चुलत भाऊ सृजन देसाई यांनी दिली. त्यामुळे प्रशासनाने भरीव आर्थिक मदत करतानाच देसाई यांच्या पत्नीला पालिकेत नोकरी देण्याची मागणी केली आहे.

Web Title: Mumbai fire brigade mourns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.