Join us

Mumbai Drug Case: फोटोतील व्यक्ती कोण? त्याचं समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांशी नातं काय? नवाब मलिक यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 09:22 IST

Mumbai Drug Case: मुंबई ड्रग्स पार्टीवरील कारवाईमुळे आरोप होत असलेले NCBचे विभागीय संचालक Sameer Wankhede यांच्याविरोधातील आक्रमक पवित्रा Nawab Malik यांनी कायम ठेवला आहे.

मुंबई - मुंबई ड्रग्स पार्टीवरील कारवाईमुळे आरोप होत असलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधातील आक्रमक पवित्रा नवाब मलिक यांनी कायम ठेवला आहे. आता नवाब मलिक यांनी एक फोटो ट्विट करत या फोटोमधील व्यक्ती कोण? असा सवाल समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांना विचारला आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर बनावट कागदपत्र सादर करणे, लग्नासाठी धर्म बदलणे अशाप्रकारचे आरोप केले होते. त्यानंतर वानखेडे यांच्याकडून स्पष्टीकरणही देण्यात आले होते. त्यानंतर नवाब मलिक यांनी काल रात्री पुन्हा एकदा एक ट्विट करून समीर वानखेडेंवर नवा आरोप केला आहे. नवाब मलिक विचारतात की, या फोटोमध्ये दिसत असलेली व्यक्ती कोण? त्याचं दाऊद वानखेडे आणि समीर दाऊद वानखेडे यांच्याशी नातं काय? असा सवाल नवाब मलिक यांनी या ट्विटमधून केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अजून एका धक्कादायक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर नवाब मलिक यांनी लोकमतशी सविस्तर चर्चा केली होती. यात त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले होते. यावेळी तुमच्या जावयावर कारवाई करुन तुरुंगात टाकलं म्हणून तुम्ही सुडबुद्धीने हे करताय? नवाब मलिक यांना विचारण्यात आलं असता,ते म्हणाले की, 'जावयावरील कारवाईमुळे सुड बुद्धीने मी हे करत नाही आहे. मुळात माझ्या जावयाविरोधात रचलेल हे कटकारस्थान होतं. माझ्या जावयाने कधीच गांजाचा व्यवसाय केला नाही. जावयाच्या एका मित्राने हर्बल तंबाखुचा व्यवसाय सुरू केला होता. त्याने माझ्या जावयालाही त्या बिझनेसमध्ये येण्यास सांगितलं होतं.'

'काही दिवसानंतर एनसीबीने जावयाला समन्स पाठवल्याच्या बातम्या माध्यमांवर पाहिल्या. हे समन पाठवल्यानंतर सर्व मीडिया माझ्या मागे लागला. याच्या काही दिवसानंतर जावयाला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडे दोनशे किलो गांजा असल्याच्या बातम्या समोर आल्या. पण, मुळात तो गांजा नव्हताच, ती हर्बल तंभाखू होती. जावयाला अटक झाल्यानंतर त्या तंबाखूचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले, त्यात हा गांजा नसल्याचे समोर आले', अशी माहिती मलिकांनी दिली. 

टॅग्स :समीर वानखेडेनवाब मलिकमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी