Join us  

Mumbai Dongri Building Collapsed : ...अन् तो चिमुकला मृत्यूच्या दाढेतून परतला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 4:57 PM

ढिगाऱ्याखाली बाहेर काढण्यात आलेला चिमुकला सुखरुप

मुंबई: डोंगरी परिसरातील तांडेल स्ट्रीट येथे असलेल्या कौसरबाग इमारत चार मजली इमारतीचा भाग कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली. या इमारतीखाली ४० ते ५० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. या दरम्यान देव तारी त्याला कोण मारी, याचा प्रत्यय देणारी एक घटना घडली. 

दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू असताना एका चिमुकल्याला बाहेर काढण्यात आलं. चार मजली इमारतीचा भाग कोसळूनदेखील चिमुकला सुरक्षित असल्यानं उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केलं. दुर्घटनास्थळी अद्यापही अनेकजण अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. कोसळलेली इमारत १०० वर्षे जुनी असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. या इमारतीत ८ ते १० कुटुंब वास्तव्यास होती. 

आतापर्यंत या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिली आहे. साबिया निसार शेख (२५), अब्दुल सत्तार कालू शेख (५५), मुझ्झमील सलमानी (१५), सायरा शेख (२५) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहेत. तर फिरोज नाझिर सलमानी (४५), आयशा शेख (३), सलमा शेख (५५), अब्दुल रहमान (३), नावेद सलमानी (३५), इम्रान हुसेन कल्वानिया (३०), जावेद (३०) आणि झिनत (३०) अशी जखमींची नावं आहेत. 

टॅग्स :इमारत दुर्घटना