Join us  

सूत्रे हलली; मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांच्या पुन्हा नव्याने बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 7:07 AM

या नियुक्त्यांपैकी ६ उपायुक्तांच्या नियुक्त्या कायम ठेवत ३ उपायुक्तांना नवीन नेमणुका देण्यात आल्या आहेत. दक्षिण मुंबईतील एका उपायुक्ताच्या नाराजीमुळे हे राजकारण घडल्याचे समजते.

मुंबई : मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांच्या बदल्यांवरून सुरू झालेले राजकारण आता निवळण्याची शक्यता आहे. रद्द केलेल्या १० उपायुक्तांपैकी ९ जणांच्या शुक्रवारी नव्याने बदल्या करण्यात आल्या. या नियुक्त्यांपैकी ६ उपायुक्तांच्या नियुक्त्या कायम ठेवत ३ उपायुक्तांना नवीन नेमणुका देण्यात आल्या आहेत. दक्षिण मुंबईतील एका उपायुक्ताच्या नाराजीमुळे हे राजकारण घडल्याचे समजते.मुंबई पोलीस दलातील परिमंडळ ५ च्या नियती ठाकेर दवे आणि परिमंडळ ३ चे अभिनाश कुमार या दोन उपायुक्तांना केंद्रात नियुक्तीवर कार्यमुक्त करण्यात आले. या रिक्त जागा भरण्यासोबत आणखी दहा उपायुक्तांच्या मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी २ जुलै रोजी अंतर्गत बदल्या केल्या. यावरून राजकारण सुरू झाले आणि राज्य शासनाने ५ जुलैला या बदल्यांना स्थगिती दिली. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती. पोलीस आयुक्तांवर आपल्या अखत्यारीत केलेल्या बदल्यांचे आदेश रद्द करण्याची नामुश्की ओढावली. त्याच रात्री त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता पुन्हा नऊ पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचे नव्याने आदेश काढण्यात आले आहेत. यात सहा उपायुक्तांच्या मागच्या वेळी केलेल्या नियुक्त्या कायम ठेवल्या आहेत.असे झाले जबाबदाऱ्यांचे वाटपगुन्हे शाखेचे उपायुक्त शहाजी उमाप यांची विशेष शाखा एकचे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे, तर सायबरचे विशाल ठाकूर यांची परिमंडळ ११ येथे बदली करण्यात आली होती. यांच्या बदल्या कायम ठेवण्यात आल्या आहेत. परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त दहिया यांना दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या अशा परिमंडळ एकची जबाबदारी देण्यात आली होती. परिमंडळ एकचे उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांची मुंबई पोलीस मुख्यालयात आॅपरेशनचे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. मात्र, नव्याने केलेल्या बदल्यांमध्ये निशाणदार यांची बदली न करता त्यांच्याकडे परिमंडळ १ ची जबाबदारी कायम ठेवली आहे. दहिया यांच्याकडे परिमंडळ ३ ची जबाबदारी सोपविली आहे. मुख्यालयाच्या एन. अंबिका यांची परिमंडळ ३ येथे यापूर्वी बदली करण्यात आल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागी सशस्त्र पोलीस बल ताडदेवचे उपायुक्त नंदकुमार ठाकूर यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, अंबिका यांना मुख्यालयात कायम ठेवत, ठाकूर यांची थेट गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.यापूर्वी पुन्हा गुन्हे शाखेत बदली करण्यात आलेले मोहन दहिकर यांच्यावर सशस्त्र पोलीस बल ताडदेवची जबाबदारी सोपविली आहे.या बदल्यांमध्ये काहींवर राजकीय मंडळींची कृपा, तर कुठे नाराजी दिसून आल्याची चर्चा आली.सायबर उपायुक्तपदी रश्मी करंदीकरसंरक्षण विभागाचे प्रशांत कदम यांची परिमंडळ ७ तर आॅपरेशनचे उपायुक्त प्रणय अशोक यांची परिमंडळ ५, पोर्ट परिमंडळाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांची सायबर उपायुक्तपदी तर विशेष शाखा एकचे उपायुक्त गणेश शिंदे हे पोर्ट परिमंडळाचे नवे उपायुक्त बनले आहेत.

टॅग्स :मुंबईपोलिस