मुंबई : मुंबई पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी अर्णब गोस्वामी, त्यांची पत्नी, रिपब्लिक टीव्ही आणि एआरजी आउटलायरच्या मालकाविरोधात सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामी व रिपब्लिकन टीव्हीने मुंबई पोलिसांची बदनामी केली व टीकाही केली, अशी त्यांची तक्रार आहे.गृह मंत्रालयाकडून आवश्यक मंजुरी घेऊन त्रिमुखे यांनी अर्णब, त्यांची पत्नी सम्यव्रता, रिपब्लिक टीव्ही एआरजी आउटलायर यांच्याविरोधात फौजदारी मानहानीची तक्रार मुंबई सत्र न्यायालयात दाखल केली. तक्रारीनुसार, रिपब्लिक टीव्हीने सुशांतसिंह राजपूत आत्महत्येच्या तपासाच्या सुरुवातीलाच त्रिमुखे आणि रिया चक्रवर्ती यांचा संशयित आरोपी म्हणून उल्लेख केला. त्यामुळे या सर्वांवर बदनामी व कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंदवावा.त्रिमुखे यांनी अर्णब व अन्य प्रतिवाद्यांकडून नुकसानभरपाईचीही मागणी केली. तसेच हा दावा चालवण्याचा खर्चही मागितला आहे.सुशांतच्या मृत्यूबाबत माहिती देण्यासाठी रियाने आपल्याशी संपर्क साधला, ती बाब अर्णव यांनी शोदरम्यान चर्चेस आणली. आपले नाव जाणूनबुजून यामध्ये गोवण्यासाठी व मुंबई पोलिसांच्या तपासावर व त्यांच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी अर्णब यांनी ही चर्चा घडवून आणली. अर्णब यांनी हेतुपूर्वक मुंबई पोलिसांवर हल्ला केला. आपला फोटो व नाव सतत टीव्हीवर झळकत होते. आपण आपल्या पदाचा गैरवापर करून आरोपींना यातून बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचे लोकांच्या मनात बिंबविण्यासाठी अर्णब यांनी प्रयत्न केला. मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्तीला पोलीस तपासातून वाचविण्यासाठी तिच्याशी सौदा केला. तसेच रियामागे लागलेला पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी पोलीसच तिला तपासाची माहिती देत होते. राजपूतच्या मृत्यूआधी एक महिन्यापासून त्रिमुखे आणि रिया संपर्कात होते, असे चित्र अर्णब यांनी रंगविले. त्यांच्या या वर्तनामुळे आपली प्रतिमा मलिन झाली. आपली मानहानी झाली असून तिची भरपाई करण्यासाठी काही काळ जावा लागेल, असे त्रिमुखे यांनी तक्रारीत नमूद केले.टीकेच्या नावाखाली बदनामी सहन करणे बंधनकारक नाही!टीका सहन करावीच लागते आणि लोकशाहीत सरकारी कर्मचाऱ्याला यासाठी तयारच राहावे लागते; परंतु, टीकेच्या नावाखाली बदनामी सहन करणे बंधनकारक नाही, असे या तक्रारीत म्हटले आहे.
अर्णब गोस्वामी, त्यांच्या पत्नीसह ‘रिपब्लिक’वर मानहानीचा दावा, मुंबई पोलीस उपायुक्तांनी दाखल केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 07:58 IST