Join us

हिरे व्यापाऱ्याचा ब्रोकरकडून विश्वासघात, जवळपास १.३० कोटींचे हिरे लांबवले

By गौरी टेंबकर | Updated: June 1, 2024 18:28 IST

Mumbai Crime News: वांद्रे पूर्व परिसरात एका हिरे व्यापाऱ्याचा ब्रोकरने विश्वासघात करत त्यांच्याकडून जवळपास दीड कोटींचे हिरे लांबवले. या विरोधात त्यांनी बीकेसी पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- गौरी टेंबकरमुंबई - वांद्रे पूर्व परिसरात एका हिरे व्यापाऱ्याचा ब्रोकरने विश्वासघात करत त्यांच्याकडून जवळपास दीड कोटींचे हिरे लांबवले. या विरोधात त्यांनी बीकेसी पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार शैलेश कलाथिया (४४) हे विलेपार्ले परिसरात राहत असून त्यांची श्रेया जेम्स नावाची हिरे खरेदी विक्रीची कंपनी आहे. तर त्यांचे कार्यालय हे भारत डायमंड बोर्स मध्ये आहे. सदर ठिकाणी हिरे-विक्रीच्या व्यवहारात ब्रोकर म्हणून काम करणारा कुणाल मेहता (३८) याच्याशी गेल्या पाच महिन्यापासून त्यांची ओळख आहे. त्याच्यासोबत यापूर्वी हिरे खरेदी विक्रीचा व्यवसाय केल्याने त्यांचा मेहतावर विश्वास होता. त्यांच्या तक्रारीनुसार मेहता हा २१ मे रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात आला. हिरे खरेदी करणारा एक व्यापारी असून त्याला हिऱ्यांची गरज आहे.

तसेच या व्यवहारात तुम्हाला चांगला नफा होईल असे सांगत त्याने कलाथिया यांच्याकडून झांगड पावतीवर अद्याप १ कोटी ३० लाख १८ हजार ७५ रुपयांचे हिरे घेतले. मात्र त्याचे पैसे दिले नाही तसेच नंतर हिरे परत करतो असे सांगत राहत्या घराला टाळे लावून आणि मोबाईल बंद करून तो पळून गेला. त्याने अन्य व्यापाऱ्यांनाही अशाच प्रकारे गंडा घातल्याचे तक्रारदाराला समजल्यानंतर त्यांनी याप्रकरणी बीकेसी पोलिसात धाव घेतली.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी