Join us  

मिलिंद देवरांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस करणार नालेसफाईची पाहणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 8:43 AM

काही ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने आणि गटाराचे किंवा नाल्याचे झाकण उघडे राहिल्याने नागरिकांना आपला जीव गमावल्याच्या घटना सुद्धा यापूर्वी घडलेल्या आहेत.  याला कारण एकच, अर्धवट नालेसफाई!

मुंबई - मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता मान्सूनच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. पण अजूनही मुंबईत ठिकठिकाणी नालेसफाई झाली नसल्याचं चित्र आहे. दरवर्षी संपूर्ण मुंबईत १००% नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महानगरपालिका करते. परंतु प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळे असते. पाणी तुंबल्यामुळे अनेकदा मुंबईकरांचा जीव धोक्यात येतो. दरवर्षी पावसावरुन मुंबईत राजकारण रंगू लागते. यंदाही अशीच परिस्थिती आहे.  

मुंबई महापालिका मुंबईतील नाल्यांची संपूर्ण सफाई झाल्याचा दावा करत आहे. पालिकेचा हा दावा कितपत खरा आहे, हे पाहण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा मुंबईतील नालेसफाईची पाहणी करणार आहेत. शुक्रवारी १४ जून रोजी, सकाळी ११ वाजता, मुंबईतील धारावी-९० फीट रोड येथून या नालेसफाई पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे. 

या पाहणी दौऱ्याबद्दल अधिक माहिती देताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा म्हणाले की, दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी तुंबते. थोडासा पाऊस पडला तरी सुद्धा काही ठिकाणी पाणी तुंबते. मुंबईची अक्षरशः तुंबई होते. मुंबईतील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचते, यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यामुळे मुंबईकर त्रस्त होतात. काही ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने आणि गटाराचे किंवा नाल्याचे झाकण उघडे राहिल्याने नागरिकांना आपला जीव गमावल्याच्या घटना सुद्धा यापूर्वी घडलेल्या आहेत.  याला कारण एकच, अर्धवट नालेसफाई! असा आरोप त्यांनी केला

तसेच मुंबईत नाल्यांची सफाई योग्य प्रकारे केली जात नाही. छोट्या नाल्यांची सफाईच होत नाही. किती नालेसफाई झाली, नाल्यांमधून किती गाळ उपसला गेला, याबद्दल पालिकेकडे काहीही आकडेवारी नसते. तरीही दरवर्षी मुंबई महापालिका मुंबईत १००% नालेसफाई दावा करते. यावर्षी असाच दावा मुंबई महापालिकेकडून केला जात आहे. मुंबई महापालिकेच्या या दाव्यामध्ये किती तथ्य आहे, हे पडताळून पाहण्यासाठी आम्ही शुक्रवार पासून मुंबईतील नालेसफाईची पाहणी करणार आहोत. त्याची सुरुवात आम्ही धारावी - ९० फीट रोड येथून करणार आहोत. यानंतर आम्ही मिठी नदीच्या सफाईची सुद्धा पाहणी करणार आहोत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी दिली.  

या नालेसफाई पाहणी दरम्यान मिलिंद देवरा यांच्या सोबत काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार वर्षा गायकवाड, भाई जगताप, नसीम खान, अमीन पटेल, अस्लम शेख, माजी आमदार चरणसिंग सप्रा आणि मनपा विरोधी पक्ष नेते रवी राजा हे सुद्धा उपस्थित असणार आहेत.  

टॅग्स :मुंबईकाँग्रेस