मुंबई महानगर क्षेत्रात १ फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांनी वाढ झाली. मात्र, टॅक्सीचालकांकडून प्रवाशांना चुकीचे दर सांगून त्यांची लूट केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. आरटीओच्या सूचनेप्रमाणे दरपत्रकानुसार भाडे घेणे अपेक्षित असले तरी टॅक्सीचालक ३१ ऐवजी ३५ ते ४० रुपयांप्रमाणे भाडे आकारणी करत आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने एमएमआर क्षेत्रातील सर्व रिक्षा-टॅक्सींना नवीन दरानुसार भाडे आकारणीची परवानगी दिली. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून तीन रुपयांनी रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला. परंतु मीटरमध्ये त्यानुसार सुधारणा न झाल्याने (रिकॅलिब्रेशन) प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात आहे. दरपत्रकही दाखविण्यास काही ठिकाणी रिक्षा-टॅक्सीचालक नकार देत आहेत.
असे केले जाते मीटर रिकॅलिब्रेशनरिकॅलिब्रेशनसाठी आरटीओने ७०० रुपये दर निश्चित केला असून ३० एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर रिक्षा-टॅक्सीचालकांकडून प्रतिदिन ५० रुपये दंड आकारणी केली जाणार आहे. अधिकृत डीलर मीटरचा जुने सील काढून त्यामध्ये नवीन भाडे दर असलेली अपडेटेड चीप बसवतात. त्यानंतर डीलरकडून लेव्हल १ वर मीटरची चाचणी करुन त्याचे सर्टिफिकेट दिले जाते. ते घेऊन आरटीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १.५ किमीची रोड टेस्ट केली जाते.