Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिहायड्रेशनचा सीझन आला; ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण 

By संतोष आंधळे | Updated: October 10, 2023 19:15 IST

या काळात जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ करत आहेत.  

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या काही दिवसांत तापमानात बदल झाल्यामुळे मुंबईकर सध्या उकाड्याने त्रस्त झाले आहेत. ऑक्टोबर हीटला नुकतीच सुरुवात झाल्याने  कडक उन्हाचा अनुभव नागरिकांना येत आहे. गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणात वातावरण आणि हवामान बदलात जागतिक पातळीवर मोठे बदल झाले आहे. सध्याच्या घडीला वातावरणातील दमट हवामानामुळे  नागरिक घामाच्या धारांमध्ये ओले चिंब झालेले पाहायला मिळत आहेत. त्यासोबत कडाक्याचे ऊन असल्याने  काही नागरिकांना डिहायड्रेशनचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या काळात जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ करत आहेत.  

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात कडाक्याचे ऊन असते. या उन्हाचा त्रास सर्व वयोगटातील नागरिकांना होत असतो. अर्थात लहान मुले, गर्भवती महिला आणि जेष्ठ नागरिकांनी या उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी दुपारच्या वेळी गरज नसेल तर घरा बाहेर पडूच नये. कारण या गरम वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात घाम येतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण अत्यल्प होते. कडक उन्हाच्या झळांमुळे नागरिकांना पायी चालताना अधिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ट्रेन आणि बसमधून कामाच्या वेळी प्रवास करताना या गर्मीने नागरिकांचा जीव नकोसा करून टाकला आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चिडचिड वाढली असून त्यामुळे अनेकवेळा भांडणे होताना दिसत आहे. 

ऑक्टोबर हिट म्हटलं कि सगळ्याच्याच अंगावर काटा येतो. कारण या काळात प्रचंड ऊन असते. त्याचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होत असतो .या वातावरणामुळे खूप घाम येतो. शरीरातील संपूर्ण पाणी शोषून घेतले जाते. त्यामुळे लघवीचे प्रमाण कमी होते. तसेच, शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सवर (पोटॅशिअम, सोडियम, क्लोराईड) परिणाम होतो. त्यामुळे चक्कर येणे, गोंधळलेली परिस्थिती निर्माण होण्यासारखी लक्षणे नागरिकांमध्ये दिसू लागतात. तसेच अनेकवेळा अंगदुखीच्या तक्रारी सुद्धा वाढल्या आहेत.  काहीवेळा अशा स्थितीचा थेट नागरिकांच्या हृदयावर आणि यकृतावर परिणाम होत असतो. या काळात डिहायड्रेशनचे रुग्ण नियमितपणे ओपीडीमध्ये येत असतात. त्यावेळी आम्ही त्यांना ओआरएस घेण्यास सांगितले जाते.- डॉ. मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, जे. जे. रुग्णालय

कोणते  होतात विकार ?  

अनेकदा चक्कर येणेजागाच्या जागी कोसळणेरक्तदाब कमी जास्त होणे हाता - पायाची आग होणे डोळे चुरचुरणे- लाल होणे लघवी मध्ये जळजळ होणे तोंड येणे ऍसिडिटीचा त्रास 

काय करावे ? 

भरपूर पाणी प्यावे लिंबू सरबत नारळ पाणी दिवसातून एकदा घ्यावे घरा बाहेर पडताना पूर्ण हाताचा शर्ट घालावा डोक्याला रुमाल बांधवा  किंवा टोपी घालावी हलका आहार घ्यावा तेलकट - तिखट खाऊ नयेनियमित व्यायाम करावा

टॅग्स :उष्माघात