Join us
Daily Top 2Weekly Top 5

होळीला चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीचे अपहरण, १२ तासांत सुटका, विक्रीचा डाव फसला

By मनीषा म्हात्रे | Updated: March 25, 2024 20:39 IST

Mumbai Crime News: भांडुपमध्ये रंगपंचमी खेळण्यासाठी दुकानात फुगे आणायला गेलेल्या अवघ्या साडेपाच वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून तिचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली.

- मनीषा म्हात्रेमुंबई - भांडुपमध्ये रंगपंचमी खेळण्यासाठी दुकानात फुगे आणायला गेलेल्या अवघ्या साडेपाच वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून तिचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. भांडुप पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा छडा लावत चार महिला आरोपींना अटक केली आहे. या चौकडीचा मुलीला विकण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची साडेपाच वर्षाची मुलगी रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घराजवळील एका दुकानात रंगपंचमी खेळण्यासाठी फुगे आणायला गेली होती. ती घरी न परातल्याने कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. मुलीचा शोध सुरु असताना एका व्यक्तीने मुलीला खुशबु गुप्ता उर्फ खुशी (१९) ही तिच्या साथीदार महिलेसोबत रिक्षात बसवून घेऊन गेल्याची माहिती दिली.

कुटुंबियांनी भांडुप पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेचे गंभीर्य लक्षात घेऊन भांडुप पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खडांगळे यांच्या पोलीस पथकाने आरोपींचा माग काढत संशयीत महिला खुशबुला ताब्यात घेतले. तिने साथीदार महिला मैना दिलोड (३९) हिच्या मदतीने मुलीला चॉकलेट देण्याच्या बाहण्याने तिचे अपहरण केल्याची कबुली दिली.

भांडुपमधून मुलीचे अपहरण केल्यानंतर मुलीला विकण्याचा या आरोपी महिलांचा डाव होता. खुशबू आणि मैनाने त्यांच्या ठाण्यातील रहिवासी महिला साथीदार दिव्या सिंग (३३) आणि पायल शहा (३२) यांच्याकडे मुलीला ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी ठाण्यातील बाळकुंब येथील एका घरावर छापेमारी करून दिव्या आणि पायलला ताब्यात घेत अपहरण झालेल्या मुलीची सुखरुप सुटका केली आहे. मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्यात वरील चारही महिलांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने या महिलांना २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौकडीचा अन्य कुठल्या गुन्ह्यात सहभाग आहे का? या दिशेनेही पोलीस अधिक तपास करत आहे.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई