Join us  

छगन भुजबळ पोहोचले शरद पवारांच्या घरी, प्रकृतीसोबतच राजकीय भविष्यावरही चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 11:05 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी दाखल झाले आहेत.

मुंबई - जामिनावर सुटका झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी दाखल झाले आहेत. जामीनावर सुटल्यानंतर छगन भुजबळ यांची शरद पवारांसोबतची ही पहिलीच भेट आहे. जामीन मिळाल्यानंतरही छगन भुजबळ स्वादुपिंडावरील उपचार घेण्यासाठी केईएम रुग्णालयात दाखल झाले होते. गुरुवारी (10 मे) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.

जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन शरद पवार यांचा आला होता, असं भुजबळांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितलं होते.  त्यानंतर आज त्यांची पवारांसोबत भेट होत आहे. 

शिवसेनेशी ऋणानुबंध आजही कायम आहेत - भुजबळ

शिवसेनेसोबत 25 वर्षे राहिलो आहे, त्यामुळे ऋणानुबंध आहेत. माझ्या पडत्या काळात शिवसेना चांगले बोलल्याचे समाधान आहे, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी गुरुवारी उद्धव ठाकरेंबाबत कृतज्ञता व्यक्त केली. 

दरम्यान, भुजबळ यांनी गुरुवारी सकाळी केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या भुजबळ यांची प्रकृती स्थिर असल्यानं घरी सोडण्यात आले. भुजबळ स्वादुपिंडाच्या आजारानं त्रस्त आहेत. राजकारणात सक्रिय होण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, तब्येत सुधारल्यानंतर लोकांमध्ये जाईन आणि 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त हल्लाबोल यात्रेला नक्की जाईन.

टॅग्स :छगन भुजबळशरद पवार