Join us  

मुंबई सेंट्रल ठरले देशातील पहिले ‘इट राइट’ स्थानक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 1:48 AM

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय)द्वारे मुंबई सेंट्रलला ‘इट राइट स्थानक’ म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे.

मुंबई : मुंबई सेंट्रल हे देशातील पहिले ‘इट राइट’ स्थानक ठरले आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे पालन, पौष्टिक आहाराची उपलब्धता, अन्नपदार्थ तयार करताना योग्य हाताळणी, कचरा व्यवस्थापन अशा विविध पातळ्यांवर देशातील पहिले ‘इट राइट’ (खाण्यासाठी योग्य) स्थानकाचा मान मुंबई सेंट्रलला मिळाला आहे.

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय)द्वारे मुंबई सेंट्रलला ‘इट राइट स्थानक’ म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे. त्याला ४ स्टारचे रेटिंग मिळाले आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

भारतीय रेल्वे प्रवाशांना दर्जेदार आहार उपलब्ध करून देण्यासाठी एफएसएसएआयने ‘इट राइट स्थानक’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत ‘इट हेल्दी’ आणि ‘इट सेफ’ अशा दोन टप्प्यांत स्थानकाचे आॅडिट करण्यात येते. या अभियानात मुंबई सेंट्रल हे एकमेव स्थानक सहभागी झाले होते. देशातील अन्य कुठलेही स्थानक अद्याप या अभियानात सहभागी झालेले नाही. स्थानकावरील अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे पालन, पौष्टिक आहाराची उपलब्धता, अन्नपदार्थ तयार करताना योग्य हाताळणी, कचरा व्यवस्थापन आदींचे आॅडिट करून स्थानकाला देशातील पहिले ‘इट राइट’ स्थानक म्हणून घोषित करण्यात आले.

खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेसाठी क्यू आर कोड

खाद्यपदार्थांचा दर्जा, खाद्यपदार्थ बनविल्याची तारीख या संदर्भातील माहिती प्रवाशांना मिळण्यासाठी प्रत्येक खाद्यपदार्थांच्या पाकिटावर ‘क्यू आर कोड’ लावण्यात आले आहेत. इंडियन रेल्वे टुरिझम अँड कॅटरिंग कार्पोरेशनने (आयआरसीटीसी) क्यू आर कोड सुविधा मुंबई सेंट्रल आणि सीएसएमटी स्थानकात सुरू केली आहे. यामध्ये प्रवाशांना पाकीटबंद पदार्थांचा दर्जा, गुणवत्ता, खाद्यपदार्थांची किंमत कळण्यासाठी क्यू आर कोडद्वारे ‘क्वॉलिटी चेक’ करता येईल.

व्यवस्थापनही अव्वल

मुंबई सेंट्रल स्थानक पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीमध्ये ‘आयएसओ १४०० : २०१५’ या प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल स्थानक तिकीट खिडकी, बुकिंग खिडकी, वेटिंग रूम यामध्ये स्वच्छता असल्याने आणि जल संरक्षण, ऊर्जा संरक्षण यामध्ये उत्तम सुविधा प्रवाशांना दिल्यामुळे, पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीमध्येही आदर्श स्थानक असल्याचा मान मिळाला़

टॅग्स :रेल्वेमुंबई