Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: शाखेवर कारवाई; महापालिकेच्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाकडून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 12:52 IST

Mumbai: शिवसेना शाखेवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला पाहून  संतप्त  कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याने मोर्चाला गालबोट लागले. 

मुंबई :  अनियमित पाणीपुरवठा, अपूर्ण नालेसफाई अशा नागरी समस्यांनी हैराण झालेल्या खार, वांद्रे व सांताक्रूझ येथील नागरिकांनी सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार ॲड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली महापालिका ‘एच’ पूर्व विभाग कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. मात्र, यादरम्यान तेथे शिवसेना शाखेवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला पाहून  संतप्त  कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याने मोर्चाला गालबोट लागले. 

वांद्रे पूर्व ठाकरे गटाच्या शाखेवर कारवाई केल्याने आक्रमक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नागरी प्रश्नांवर जनमत तयार करून पालिका ‘एच’ पूर्व कार्यालयावर मोर्चा काढला. त्यासाठी गेली तीन दिवस जोरदार तयारी सुरू होती. पाच माजी नगरसेवक या मोर्चात सहभागी झाले होते. पोलिसांनी शिष्टमंडळातील सदस्य सोडून इतरांना प्रवेश नाकारल्याने मोर्चेकरांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. सरकार, पालिका आणि पोलिसांविरोधात जोरदार नारेबाजी केली.  त्यानंतर शिष्टमंडळ पालिका सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांना भेटायला गेले होते. तर काही ठाकरे समर्थक पालिका कार्यालयात आधीच शिरले होते. चर्चेच्या वेळी  वांद्रे पूर्व येथील शिवसेना शाखेवर कारवाई करणाऱ्या एका अधिकाऱ्याला बोलावले. त्यामुळे त्यांना पाहून  ठाकरे गटाच्या शाखा प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याला मारहाण केली. त्यामुळे  तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अनिल परब यांचा इशारा  आम्ही बाळासाहेबांचा अपमान कधीच सहन करणार नाही. ज्यांनी अपमान केला, त्यांनी परिणामाला तयार राहिले पाहिजे, असे सांगत उद्या पालिका अधिकाऱ्यांना दाखवतो अनधिकृत बांधकामे कुठे आहेत. हिंमत असेल तर ती तोडा. अन्यथा तुम्हालाच आम्ही तोडतो. असाही इशारा त्यांनी दिला.मोर्चात दोन गट आमने सामने यावेळी परब यांच्याबरोबरही कार्यकर्ते होते तर त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते सुद्धा हातात काळे झेंडे घेऊन पालिकेवर आले होते.पण पोलिसांनी मध्यस्थी करीत सर्वाना शांत केले.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिकाशिवसेना