जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे जहाज पायलट कॅप्टन अनमोल श्रीवास्तव यांनी मुंबई दुर्घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. कॅप्टन अनमोल श्रीवास्तव यांनी फक्त १२ लोकांची क्षमता असलेल्या बोटीचा वापर करून ५६ लोकांचा जीव वाचवला आहे. नील कमल नावाची बोट १८ डिसेंबर रोजी नौदलाच्या जहाजाला धडकली, त्यामुळे बोट बुडाली. या भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी या बोटीवर १०० हून अधिक लोक होते.
अपघात होताच नौदलाला एक अलर्ट मिळाला आणि त्यांनी तातडीने बचाव पथकाला अपघातस्थळी पाठवलं. पायलट कॅप्टन अनमोल श्रीवास्तव घटनेच्या काही मिनिटांनंतर लगेचच घटनास्थळी पोहोचले. "जहाज एस्कॉर्ट करून बंदरावर परतत असताना एक बोट बुडत असल्याचा रेडिओवर एसओएस कॉल आला. आम्ही पाच मिनिटांत घटनास्थळी लगेचच पूर्ण वेगाने पोहोचलो. बोट जवळजवळ पूर्णपणे बुडाली होती."
"लहान मुलांसह प्रवाशांनी बोटीला घट्ट पकडलं होतं. काही पालकांनी आपल्या मुलांना पाण्याच्यावर धरून ठेवलं होतं. अजिबात वेळ न वाया घालवता आम्ही लोकांनी बोटीवर खेचण्यासाठी बुडणाऱ्या लोकांना लाईफ जॅकेट दिले. लोक खूप घाबरले होते. प्रत्येकालाच आपला जीव वाचवण्यासाठी बोटीत चढायचं होतं, पण आम्ही आधी लहान मुलांना, नंतर वृद्ध महिलांना आणि नंतर पुरुषांना वाचवलं" असं कॅप्टन अनमोल यांनी म्हटलं आहे.
जहाजाची क्षमता फक्त १२ लोकांना घेऊन जाण्याची होती, तरीही कॅप्टन श्रीवास्तव यांनी त्यांच्या सागरी अनुभवाचा उपयोग करून जहाजाचं संपूर्ण मूल्यांकन केलं आणि ५७ लोकांचा जीव वाचवला. यामध्ये एका सात वर्षांच्या मुलाचा समावेश होता, सीपीआर देण्यात आला पण मुलाचा मृत्यू झाला. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.