भाटी कुटुंबीयांनी हात दिसताच फोडला हंबरडा; अखेर २६ तासांनंतर सापडला हंसाराम यांचा मृतहेद
By मनीषा म्हात्रे | Updated: December 20, 2024 09:18 IST2024-12-20T09:16:49+5:302024-12-20T09:18:02+5:30
२६ तासांनंतर त्यांच्या शोधासाठी सुरू असलेली मोहीम अखेर थांबली.

भाटी कुटुंबीयांनी हात दिसताच फोडला हंबरडा; अखेर २६ तासांनंतर सापडला हंसाराम यांचा मृतहेद
मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : समुद्रातील दुर्घटनाग्रस्त नीलकमल बोटीखालून हात बाहेर आल्याची माहिती मिळताच मदत पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि बोटीखाली अडकलेल्या या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह हंसाराम यांचा असल्याचे स्पष्ट झाल्याने कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. २६ तासांनंतर त्यांच्या शोधासाठी सुरू असलेली मोहीम अखेर थांबली.
मालाडचे रहिवासी असलेले भाटी यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. ते पत्नी आणि मुलगा, मुलीसोबत मालाडच्या तानाजी नगर येथे राहतात. दोन दिवसांपूर्वी राजस्थानमधील नातेवाईक प्रवीण राठोड आणि नीता हे त्यांच्याकडे राहण्यास आले होते. तेव्हा हंसाराम यांनी गेट वे हून एलिफंटा लेणी येथे फिरायला जाण्याचा प्लॅन केला. मात्र, बोट दुर्घटना झाली आणि कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले. या दुर्घटनेत राठोड दाम्पत्य आणि भाटी यांची पत्नी संतोष आणि मुलगा तरुण
वाचला आहे.
अपघात झाल्यानंतर तरुण भाटी याने वडिलांना डोळ्यादेखत पाण्यात बुडताना पाहिले. हंसाराम यांच्या दिशेने लाईफ जॅकेटही फेकण्यात आले, मात्र ते वाचू शकले नाहीत, असे त्याने सांगितले. अपघातानंतर मदतीसाठी आलेल्या नौदल अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरून गावाकडील नातेवाईकांशी संपर्क करून त्यांना अपघाताबाबत कळवले. त्यानंतर मुंबईतील नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतल्याचे नातेवाईक जोगाराम भाटी यांनी सांगितले. हंसाराम यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे छायाचित्र गेट वे ऑफ इंडिया आणि कुलाबा पोलिस ठाण्यात देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास बोटीखालून हात बाहेर आल्याचे समजताच पथकाने त्या भागात शोध सुरू केला. तेव्हा बोटीखाली अडकलेला मृतदेह काढण्यास सुरुवात केली. बोटीचा काही भाग कापून मृतदेह बाहेर काढून जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला. तेथे तो मृतदेह हंसाराम असल्याचे स्पष्ट होताच भाटी कुटुंबीयांनी जे. जे. रुग्णालयात धाव घेतली. तेथे त्यांनी टाहोच फोडला.