Mumbai Mayor: सर्वात श्रीमंत महापालिकेच्या महापौरपदासाठी ‘चारचौघी’मध्ये चुरस! कोण होणार मुंबईची 'बॉस'?
By जयंत होवाळ | Updated: January 23, 2026 10:47 IST2026-01-23T10:44:18+5:302026-01-23T10:47:02+5:30
Mumbai BMC Mayor: भाजपच्या वर्तुळात सर्वसाधारण प्रवर्गातून 'या' चार नावांची चर्चा

Mumbai Mayor: सर्वात श्रीमंत महापालिकेच्या महापौरपदासाठी ‘चारचौघी’मध्ये चुरस! कोण होणार मुंबईची 'बॉस'?
जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आरक्षण साेडतीत सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे महापौरपदासाठी भाजपच्या वर्तुळात या प्रवर्गातून माजी उपमहापौर अलका केरकर, राजेश्री शिरवाडकर, रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्यात प्रमुख चुरस असेल. पण भाजपने नेहमीचे धक्कातंत्र वापरले तर अन्य प्रवर्गांतूनही महापौरपदासाठी चेहरा दिला जाऊ शकतो. तसे झाल्यास योगिता कोळी आणि प्रीती सातम यांचीही नावे पुढे येऊ शकतात.
यंदा भाजपच्या ४९ नगरसेविका निवडून आल्या असून त्यापैकी २५ नगरसेविकांनी याआधीही नगरसेवकपद भूषवलेले आहे. यात प्रमुख चर्चेत असलेल्यांपैकी केरकर आणि शिरवाडकर यांची निवडून येण्याची ही तिसरी वेळ आहे. वॉर्ड १७२ (सायन किल्ला) मधून विजयी झालेल्या शिरवाडकर यांच्याकडे स्थायी समिती सदस्यपदाचाही अनुभव आहे. त्या मुंबई महिला मोर्चाच्या सरचिटणीस आहेत. ज्येष्ठता आणि अनुभव या शिरवाडकर आणि केरकर यांच्या जमेच्या बाजू आहेत.
रितू तावडे यांनी २०१२ साली भाजपमध्ये प्रवेश केला आणि वॉर्ड क्र. १३२ (सोमय्या-विद्याविहार) मधून त्या पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. २०१७ साली त्यांचा पराभव झाला होता. यंदा त्या पुन्हा विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिक्षण समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. त्या आक्रमक स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जातात. वॉर्ड १९० (दादर - माहीम) मधून शीतल गंभीर या दुसऱ्यांदा नगरसेविका बनल्या आहेत. त्यांनी भाजपच्या मुंबई महिला मोर्चाचे अध्यक्ष पदही भूषवले आहे. दादर माहीम भागातील सहा वॉर्डांपैकी गंभीर यांनी अटीतटीच्या लढतीत भाजपचा वॉर्ड राखला आहे. प्रचारसभेत जेव्हा आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खुल्या व्यासपीठावर चर्चेचे आव्हान दिले होते, तेव्हा त्यास प्रत्युत्तर देताना. ‘आमच्या शीतल गंभीर त्यासाठी पुरेशा आहेत,’ असे फडणवीस यांनी म्हटले होते.