मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
By जयंत होवाळ | Updated: October 9, 2025 10:28 IST2025-10-09T10:28:38+5:302025-10-09T10:28:50+5:30
Mumbai BMc Election Politics: इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली; खुल्या गटात १४९ प्रभाग, तर ओबीसींसाठी ६१ जागा

मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
- जयंत होवाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेच्या २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीचे प्रभाग आरक्षण एक प्रकारे स्पष्ट झाल्याने उमेदवारीचे वेध लागलेल्या माजी नगरसेवकांमध्ये धाकधूक वाढली आहे. २२७ प्रभागांपैकी १५ प्रभाग अनुसूचित जातीसाठी आणि दोन प्रभाग अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे आठ माजी नगरसेवकांची उमेदवारी धोक्यात आली आहे.
संबंधित संभाव्य आरक्षणाच्या प्रभागात २०१७ मध्ये तेव्हाच्या एकसंध शिवसेनेचे ५, काँग्रेस, मनसे आणि भाजपचा प्रत्येकी एका नगरसेवक निवडून आला होता. या नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे यापैकी कितीजणांची उमेदवारी कायम राहते. त्यांचे अन्य प्रभागांत पुनर्वसन होणार का? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल. प्रत्येक पक्षाला येथे उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर...
शिवसेनेतील फाटाफुटीनंतर परमेश्वर कदम (प्रभाग क्र. १३३) आणि प्रतिमा खोपडे (प्रभाग क्र. ५९ ) शिंदेसेनेत गेले आहेत. काँग्रेसचे विठ्ठल लोकरे (प्रभाग क्र. १४१) यांनी उद्धवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. मनसेच्या (प्रभाग क्र. १८९) हर्षला मोरे यांनी पालिका अस्तित्वात असतानाच उद्धवसेनेत प्रवेश केला होता.
माजी महापौर किशोरी पेडणेकर (प्रभाग क्र. १९९) या उद्धवसेनेतच आहेत. कदम, लोकरे, पेडणेकर, भाजपचे राजेश फुलवारिया (प्रभाग क्र. १५१), शिंदेसेनेचे उपेंद्र सावंत (प्रभाग क्र. ११८) यांचा प्रभाग आधी खुला होता. तो आता अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे.
दुधवडकर, मोरे, खोपेडे यांच्यापुढे पेच
उद्धवसेनेच्या अरुंधती दुधवडकर (प्रभाग क्र. २१५) आणि हर्षला मोरे यांचा प्रभाग २०१७च्या निवडणुकीत महिलांसाठी आरक्षित होता. हे दोन्ही प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहेत. या प्रभागांत उमेदवारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. खोपडे यांचा प्रभाग अनुसूचित जातीसाठी होता, तो आता अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाला आहे, त्यामुळे त्यांचीही उमेदवारी धोक्यात आली आहे.
२०११ च्या जनगणनेच्या आधारावर आताची निवडणूक होणार आहे. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी १७ प्रभाग आरक्षित झाले आहेत. त्याव्यतिरिक्त २१० पैकी ६१ प्रभाग ओबीसींसाठी, १४९ प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी असतील. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण कायम असेल.
‘या’ माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षण कायम
नादिया शेख, राष्ट्रवादी (प्रभाग क्र. १४०)
शरद पवार गट
समृद्धी काते, शिंदेसेना (प्रभाग क्र. १४६)
अंजली नाईक, उद्धवसेना (प्रभाग क्र. १४७)
आशा मराठे, भाजप (प्रभाग क्र. १५२)
श्रीकांत शेट्टे, उद्धवसेना (प्रभाग क्र. १५५)
गंगा माने, काँग्रेस (प्रभाग क्र. १८३)
वसंत नकाशे, उद्धवसेना (प्रभाग क्र. १८६)
रोहिणी कांबळे, उद्धवसेना (प्रभाग क्र. ९३)
रेखा रामवंशी, उद्धवसेना (प्रभाग क्र. ५३)
माझ्या मतदारसंघात एवढी कामे केली आहेत, की त्यामुळे आमच्याच पक्षाचा कोणताही उमेदवार येथून सहज निवडून येऊ शकतो. माझा प्रभाग आरक्षित झाल्यामुळे माझ्या बाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.
- किशोरी पेडणेकर, माजी महापौर
प्रभाग आरक्षित झाल्यामुळे उमेदवारीचा प्रश्नच येत नाही. अन्य वॉर्डातून लढणार नाही. माझ्या नगरसेवकपदाच्या कार्यकाळात लोकोपयोगी कामे केली आहेत. त्यामुळे उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी हरकत नाही.
- परमेश्वर कदम, माजी नगरसेवक, शिंदेसेना