Join us
Daily Top 2Weekly Top 5

निवडून दिलेले नगरसेवक ‘बेपत्ता’: अमित ठाकरे; शिंदेसेनेच्या ‘हॉटेल पॉलिटिक्स’वर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 06:08 IST

विश्वास ठेवलेल्या जनतेसाठी काहीतरी करा, असेही ते म्हणाले

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महापालिकेच्या निकालानंतर शिंदेसेनेने नवनिर्वाचित २९ नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते. शिंदेसेनेच्या या हॉटेल पॉलिटिक्सवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी मंगळवारी समाज माध्यमांवर पोस्ट करत टीका केली. जनतेने निवडून दिलेले नगरसेवक बेपत्ता आहेत. त्यांच्या प्रभागात ते दिसत नाहीत. त्याऐवजी फाईव्ह स्टार हॉटेल्सच्या बंद दाराआड ते ‘आनंदाने कैद’ असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.

निकाल जाहीर झाल्यावर लोकप्रतिनिधींनी प्रभागातील जनतेचे आभार मानायला हवे होते. त्यांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती. पण, निवडून आलेल्यांना हॉटेलमध्ये ठेवण्याचे कारण काय? हा स्वतःच्याच सहकाऱ्यांवर अविश्वास आहे की यामागे काही स्वार्थी राजकारण आहे. अशा पळवापळवीमुळे मतदान करणाऱ्या सामान्य नागरिकांचा अपमान होत नाही का? महाराष्ट्राचे राजकारण आणखी किती खाली घसरणार आहे, असे प्रश्न अमित यांनी उपस्थित केले आहेत.

‘विश्वास ठेवलेल्या जनतेसाठी काहीतरी करा’

स्वतःचे कष्टाचे पैसे भरून हॉटेल बुकिंग केलेल्या पर्यटकांना सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागत आहे. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला तमाशा आणि जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवा. तुमच्या विश्वास ठेवलेल्या जनतेसाठी काहीतरी करा, असेही अमित ठाकरे यांनी म्हटले.

English
हिंदी सारांश
Web Title : Elected Corporators 'Missing': Amit Thackeray Criticizes Shinde Sena's 'Hotel Politics'

Web Summary : Amit Thackeray criticizes Shinde Sena for housing newly elected corporators in a five-star hotel post-election. He questions the absence of corporators from their constituencies, accusing them of prioritizing 'imprisonment' in luxury hotels over public service. Thackeray also condemns the misuse of public funds.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६अमित ठाकरे