मुंबई हे सुंदर शहर - रॉबिन वॉरेन
By Admin | Updated: January 10, 2015 02:17 IST2015-01-10T02:17:28+5:302015-01-10T02:17:28+5:30
गेल्या १५७ वर्षांची उज्ज्वल आणि समृद्ध परंपरा असलेले आणि देशातील सर्वांत जुने विद्यापीठ म्हणून ख्याती असलेले मुंबई विद्यापीठ हे उत्कृष्ट विद्यापीठ आहे.

मुंबई हे सुंदर शहर - रॉबिन वॉरेन
मुंबई : गेल्या १५७ वर्षांची उज्ज्वल आणि समृद्ध परंपरा असलेले आणि देशातील सर्वांत जुने विद्यापीठ म्हणून ख्याती असलेले मुंबई विद्यापीठ हे उत्कृष्ट विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत असून हे शहर सुंदर आहे, असे जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते रॉबिन वॉरेन यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसला रॉबिन वॉरेन यांनी शुक्रवारी भेट दिली. नव्याने वातानुकूलित करण्यात आलेल्या फोर्ट येथील सर फिरोजशहा मेहता व्यवस्थापन कक्ष, सुुशोभित आणि अद्ययावत लॉबीचे उद्घाटन रॉबिन वॉरेन यांच्या हस्ते करण्यात आले; या वेळी ते बोलत होते. वॉरेन यांनी भेटीदरम्यान विद्यापीठ प्रशासनाशी सखोल चर्चा केली. त्यांनी सर जहांगीर कावसजी दीक्षान्त सभागृह आणि राजाबाई टॉवर आणि मुख्य ग्रंथालयाला भेट दिली. ग्रंथालयात असलेल्या अतिप्राचीन आणि जुने हस्तलिखित तसेच दुर्मीळ ग्रंथांची पाहणी केली. चारशे वर्षांपूर्वीचे हस्तलिखित पाहून रॉबिन भारावून गेले. मुंबई विद्यापीठाने जतन करून ठेवलेल्या या अतिप्राचीन आणि दुर्मीळ खजिन्याबद्दल त्यांनी कौतुक केले. फिजीओलॉजीसाठी रॉबिन वॉरेन यांना २००५ साली नोबेल पारितोषिकाने सन्मानित केले होते. मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या १०२व्या भारतीय विज्ञान परिषदेसाठी त्यांना मुंबई विद्यापीठाने आमंत्रित केले होते. (प्रतिनिधी)