Join us  

नोटांवरून गांधींचा फोटो हटवा, महिला IAS अधिकाऱ्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 8:54 PM

निधी चौधरी यांनी गेल्या 17 मे रोजी एक वादग्रस्त ट्विट केले होते. 

मुंबई : महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त ट्विट केल्यामुळे एक महिला आयएएस अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. निधी चौधरी असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. निधी चौधरी यांनी गेल्या 17 मे रोजी एक वादग्रस्त ट्विट केले होते. 

महात्मा गांधींचे नोटांवरुन फोटो काढून टाका, जगभरातील त्यांचे पुतळे हटवा, असे ट्विट केले होते.  या वादग्रस्त ट्विटमुळे निधी चौधरी यांच्यावर टीकेची झोड उटली. यानंतर त्यांनी ट्विट डिलीट केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निधी चौधरींना निलंबित करण्याची मागणी केली आहे.   

निधी चौधरी या आयएएस 2012 बॅचच्या असून सध्या मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (विशेष) आहेत. याआधी त्या सहाय्यक कलेक्टर होत्या. दरम्यान, निधी चौधरी यांनी आज महात्मा गांधीच्या पुतळ्यासोबतचे फोटो ट्विटरवर अपलोड करत माझ्या ट्विटचा विपर्यास केला असल्याचे म्हटले आहे. '17 मे रोजी करण्यात आलेले ट्विट मी डिलीट केले आहे. कारण काही लोकांचा गैरसमज झाला आहे. 2011 पासून जर या लोकांनी मला फॉलो केले असते तर मी गांधीजींचा अनादर करण्याचा विचारही करू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात आले असते. मी श्रद्धापूर्वक गांधीजींचा आदर करत असून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा आदर करत राहीन,' असे निधी चौधरी यांनी म्हटले आहे.

 

निधी चौधरींचे आधीचे ट्विट..."महात्मा गांधी यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र आता वेळ आली आहे. ज्या रस्ते, संस्थांना गांधीचे नाव दिले आहे, ते काढण्यात यावे, जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत तसेच नोटेवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा. हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 30-1-1948 साठी थँक्यू गोडसे."

टॅग्स :मुंबईजितेंद्र आव्हाडमुंबई महानगरपालिका