Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Bandh: आज काय बंद राहणार, काय सुरू राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 06:18 IST

मुंबईतील दादर येथे झालेल्‍या बैठकीत अत्‍यावश्‍यक सेवांना या बंदमधून सूट देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला

मुंबई - मराठा क्रांती मोर्चातर्फे आज मुंबई बंदची हाक देण्‍यात आली आहे. यासोबतच ठाणे, पालघर, रायगड येथेही उद्या बंद पुकारण्‍यात आला आहे. मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाच्‍या समन्‍वयकांच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला आहे. या बंदतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांचा समावेश आहे. तसेच शाळांच्या बसेसही सुरु ठेवण्यात येणार आहेत. 

मुंबईतील दादर येथे झालेल्‍या बैठकीत अत्‍यावश्‍यक सेवांना या बंदमधून सूट देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. दहावी व बारावीची फेर परीक्षा असल्याने शाळा व महाविद्यालयांना बंदमधून वगळण्यात आले आहे. तसेच शाळांच्‍या बसेस, दुधाच्‍या गाड्या यांनाही बंददरम्‍यान अडवण्‍यात येणार नाही.  मात्र याशिवाय कोणत्‍याही खासगी वाहनाला रस्‍त्‍यावर फिरू दिले जाणार नाही, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. ज्‍यांना मराठा क्रांती मोर्चाच्‍या मागण्‍यासंदर्भात सहानुभूती आहे, त्‍यांनी बंदला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन समन्‍वयकांतर्फे करण्‍यात आले आहे.  

या सेवा सुरू : शाळा, महाविद्यालये, रक्तपेढ्या, रुग्णालये, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, दूध टँकर, स्कूल बस, रेल्वे, मोनो, मेट्रो

या सेवा बंद : बेस्ट, एसटी, टॅक्सी, रिक्षा, खासगी वाहने, दुकाने, बाजारपेठा, उद्योग 

मराठा क्रांती मोर्चाकडून आचारसंहिता -  बंद शांततेत पार पाडावा, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने कार्यकर्त्यांसाठी आचारसंहिता लागू केली आहे. कुठेही तोडफोड, जाळपोळ करू नये. प्रक्षोभक व्हिडीओ व्हायरल करू नये असे अवाहनही करण्यात आले आहे. सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. आपले हे आंदोलन सरकारविरोधी असून त्यास जातीय रंग देऊ नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाकडून आचारसंहिता करत करण्यात आले आहे.   

टॅग्स :मराठा क्रांती मोर्चामुंबई