Join us  

'एक नंबर' बातमी... चिमुकल्या तीरा कामतला दिलं १६ कोटींचं इंजेक्शन; सुफळ संपूर्ण झालं आई-बाबांचं 'मिशन'

By जयदीप दाभोळकर | Published: February 26, 2021 6:11 PM

उद्यापर्यंत तीराला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशुक्रवारी सकाळी देण्यात आलं इंजेक्शनयापूर्वी राज्य आणि केंद्र सरकारनं माफ केली होती सहा कोटींची रक्कम

मुंबईत राहणाऱ्या तीरा कामत या चिमुकलीला SMA Type 1 हा दुर्धर आजार असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यावरील उपचारासाठी लागणारं १६ कोटी रूपयांचं इजेक्शन मागवण्याचे शर्थीचे प्रयत्न कामत कुटुंबीयांनी सुरू केले होते. दरम्यान, तिच्यावरील उपचारासाठी आवश्यक असलेलं इंजेक्शन तीराला शुक्रवारी सकाळी देण्यात आलं. तीराला हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून तिला याच ठिकाणी सकाळी ते इंजेक्शन देण्यात आलं. दरम्यान, तीराला लवकरात लवकर या आजारातून बरी व्हावी यासाठी सर्वांनीच सदिच्छा दिल्या होत्या.तीराला शुक्रवारी सकाळी उपचारासाठी आवश्यक असलेलं इंजेक्शन देण्यात आल्याची माहिती तीराचे वडिल मिहिर कामत यांनी लोकमत ऑनलाईनशी बोलताना दिली. तसंच तिला सध्या हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सकाळपर्यंत तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. देशात आतापर्यंत ११ बाळांना हे इंजेक्शन देण्यात आलं आहे. क्राऊड फंडिंगमधून जमवले १६ कोटीSMA Type 1 हा आजार तसा दुर्मिळ आहे. भारतात सध्या या आजारावर कोणतंही औषध नाही. परंतु अमेरिकेत या आजारावरचं औषध उपलब्ध आहे. सध्या तीराची प्रकृती पाहता तिला अमेरिकेत नेऊन उपचार करणं शक्य नसल्यानं मिहिर आणि प्रियांका कामत यांनी ते इंजेक्शन भारतात आणण्याचा निर्णय घेतला. परंतु त्या इंजेक्शनसाठी लागणारा खर्च हा फार मोठा होता. या इंजेक्शनसाठी तब्बल १६ कोटी रूपये मोजावे लागणार होते. मिहिर हे एका आयटी कंपनीत काम करतात. तर प्रियांका या फ्रिलांस इलेस्ट्रेटर म्हणून काम करतात. १६ कोटी रूपयांएवढी मोठी रक्कम कशी जमवायची असा प्रश्न दोघांच्या समोर होता. त्याचवेळी त्यांना कॅनडामध्ये मोठ्या आजारांसाठी क्राऊड फंडिंगचा आधार घेतला जात असल्याचं वृत्त दिसलं. त्यामुळे त्यांनीही असेच पैसे उभारण्याचा निर्णय घेत तीरासाठी सर्वकाही करायचा निश्चय घेतला. "उभ्या आयुष्यात आपण कधी १६ कोटी रूपये पाहिले नाहीत. परंतु आता सुरूवात केली पाहिजे असं ठरवलं. एका व्यक्तीला क्राऊड फंडिंगद्वारे पैसे जमा करताना पाहून आपणदेखील असं करू शकतो असा विश्वास निर्माण झाला," असं मिहिर यांनी यापूर्वी सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर तीराला असलेल्या आजाराविषयी माहिती शेअर केली. तसंच त्यांनी 'फाईट्स एसएमए' असं इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पेजही तयार केलं. यानंतर त्यांच्याकडे मदतीचा ओघ सुरू झाला आणि त्यांनी या क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून १६ कोटी रूपये जमवले होते.

सरकारकडूनही मदतया इंजेक्शनसाठी पैसे जरी जमले असले तरी ते भारतात आणायचं कसं हा प्रश्न कामत कुटुंबीयांसमोर होता. हे औषध भारतात आणण्यासाठी लागणारा कर, जीएसटी यांची रक्कम मिळून ती जवळपास सहा कोटींवर जात होती. परंतु राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं आणि केंद्र सरकारनं दिलासा देत यावर आकारण्यात येणारं शुल्क आणि जीएसटीची रक्कम माफ केली होती. दरम्यान, त्यांच्या संपूर्ण प्रक्रियेत चित्रपट अभिनेता निलेश दिवेकर यानंदेखील त्यांना मोलाची मदत केली होती. 

टॅग्स :मुंबईहॉस्पिटलआरोग्य