Join us

मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 14:16 IST

प्रवाशांच्या बॅगांमध्ये चाकू, बॅटरी, खेळणी, सेलो टेप, मिरच्या, लाईटर, ई-सिगारेट, नारळ, तेल इत्यादी वस्तू असतात. कोणत्या वस्तू विमानातून नेता येतात, कोणत्या नाहीत हे माहित नसल्याने अनवधानाने आणल्या जातात.

मुंबई विमानतळावर प्रवाशांकडून जप्त केलेले नारळ आणि तेलाच्या बाटल्या स्वत:च्या वापरासाठी नेल्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर आले आहे. प्रवाशांच्या बॅगेतून जप्त केलेले सामान हे कचऱ्यात टाकले जाते, परंतू या अधिकाऱ्यांनी ते वापरात आणले म्हणून त्यांना नारळ देण्यात आला आहे. 

प्रवाशांच्या बॅगांमध्ये चाकू, बॅटरी, खेळणी, सेलो टेप, मिरच्या, लाईटर, ई-सिगारेट, नारळ, तेल इत्यादी वस्तू असतात. कोणत्या वस्तू विमानातून नेता येतात, कोणत्या नाहीत हे माहित नसल्याने अनवधानाने आणल्या जातात. त्या वस्तू बॅग तपासणीवेळी प्रवाशांकडून काढून घेतल्या जातात. नंतर या वस्तूंचे काय होते, हे कोणालाच माहिती नव्हते. परंतू, आता ते समोर आले आहे. 

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (MIAL) च्या एचआर विभागाने ही कारवाई केली आहे. ऑगस्टच्या पहिल्या तारखेला आरोपी अधिकाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यात आले होते. हे अधिकारी या प्रतिबंधित वस्तू वैयक्तीक वापरासाठी घेऊन जात होते. महत्वाचे म्हणजे या सर्व अधिकाऱ्यांची विमानतळावरील सेवा ही १० ते २० वर्षे झालेली आहे. म्हणजे आतापर्यंत किती जप्त झालेल्या वस्तू या अशा अधिकाऱ्यांनी बाहेर नेल्या असतील याचा आकडा हे अधिकारी देखील सांगू शकणार नाहीत असा आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांना तात्काळ राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच राजीनामा नाही दिला तर काढून टाकण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. सीनियर ड्यूटी टर्मिनल ऑफिसर, ड्यूटी टर्मिनल मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर आणि सीनियर एग्जीक्यूटिव अशा पदांवरील हे अधिकारी आहेत. 

सीआयएसएफ विमानतळावर प्रवाशांकडून जप्त केलेल्या वस्तू एमआयएएल टर्मिनल ऑपरेशन विभागाकडे पाठवते. जप्त केलेल्या वस्तू दर १२ तासांनी रजिस्टरमध्ये नोंदवाव्या लागतात. नंतर या वस्तू कचऱ्यात फेकल्या जातात किंवा बॉक्समध्ये पॅक केल्या जातात आणि एनजीओ रेस्क्यू फाउंडेशनद्वारे नेल्या जातात.परंतू हे अधिकारी आपलेच उखळ पांढरे करत होते. 

टॅग्स :विमानतळ