Join us

सोफा, डायनिंग टेबल, लायब्ररी अन् बरंच काही; CSMT चा नवा लाऊंज लय भारी

By सायली शिर्के | Updated: October 27, 2020 09:10 IST

Namah Waiting Lounge CSMT : मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे एका वातानुकुलित (AC) वेटिंग लाऊंज सुरू केला आहे. 

मुंबई - सणसुदीच्या काळात अनेक जण रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करत असतात. पण अनेकदा लांबचा प्रवास करताना प्रवाशांना काही समस्यांचा सामना करावा लागतो. कधी कधी काही कारणास्तव खूप वेळ स्टेशनवरच थांबावे लागते. मात्र आता रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. कारण अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असं नवा लाऊंज  सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना ट्रेनची वाट पाहण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभं राहण्याची गरज नाही. मध्य रेल्वेनेछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे एका वातानुकुलित (AC) वेटिंग लाऊंज सुरू केला आहे. 

"नमह:" (Namah Waiting Lounge) असं या वेटींग लाऊंजचं नाव असून रेल्वे प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. यासाठी प्रवाशांकडून प्रति तास फक्त 10 रुपये आकारण्यात येणार आहेत. सीएसएमटी मेनलाईन स्टेशन प्रवेशद्वाराच्या  प्लॅटफॉर्म 14, 15, 16, 17 आणि 18 ला जोडणाऱ्या कॉरिडॉरला हे वेटिंग लाऊंज जोडलेले आहे. नव्या वेटिंग लाऊंजमध्ये डायनिंग टेबल, सोफा, टॉयलेट, बाथरूम, लायब्ररी, कॅफे, डेडिकेटेड चार्जिंग पाँईंट्स, डिस्पोजेबल लिनन किट्स आणि इतरही अनेक गोष्टी असणार आहेत. 

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असा लाऊंज

प्रवाशांना रेल्वे प्रवासाची माहिती व्हावी यासाठी अधिकाऱ्यांनी वेटिंग लाऊंजमध्ये एलईडी स्क्रीन देखील लावली आहे. जेणेकरून ट्रेन्स कधी येणार त्याची वेळ तसेच सुटण्याची वेळ प्रवाशांना समजण्यास मदत होणार आहे. या लाऊंजमध्ये स्पीकर्सही आहेत ज्यामधून स्टेशन ऑपरेटरच्या घोषणा ऐकता येतील. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी जेव्हा लाऊंजमध्ये प्रवेश करतील तेव्हा सुरुवातीला 50 रुपये आकारले जातील. यामध्ये 40 रुपये हे सुरक्षितता ठेवी म्हणजे Advanced म्हणून आकारले जातील. जेव्हा प्रवासी लाऊंज सोडतील तेव्हा त्यांना त्यांनी आधी दिलेले 40 रुपये पुन्हा दिले जाणार आहेत.

5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी पाच रुपये शुल्क

पाच वर्षांखालील मुलांना विनामूल्य प्रवेश आहे. तर 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी पाच रुपये शुल्क आकारले जाणार आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आमच्या स्थानकांवर प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरवणं हे आमचं मुख्य उद्दीष्ट आहे.  जर हे मॉडेल यशस्वी ठरलं तर आम्ही एलटीटी, दादर, ठाणे आणि कल्याण अशा इतरही स्थानकांवर अशीच लाऊंज उभारू. या स्थानकांवर ही लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. विमानतळावरील लाऊंजच्या तुलनेत याचे शुल्क कमी आहे." 

प्रवाशांसाठी बॅग रॅपिंग आणि सॅनिटायझेशनचीही सुविधा

सामान्य वेटिंग रुम हे विनामुल्य राहतील. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये हा यामागचा हेतू आहे असं देखील शिवाजी सुतार यांनी म्हटलं आहे. मध्य रेल्वेने सीएसएमटी स्टेशनवर प्रवाशांसाठी बॅग रॅपिंग आणि सॅनिटायझेशनची सुविधा सुरू केली आहे. सामानाच्या आकारानुसार शुल्क हे 60 ते 80 रुपये दरम्यान निश्चित केलं जाईल. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे वेटिंग लाऊंज अत्यंत उपयुक्त ठरणारआहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :मुंबई बंदमध्य रेल्वेरेल्वेछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस