तीन दिवस मुंबई विमानतळ एक तासासाठी बंद; भारतीय हवाई दलाचा सराव होणार
By मनोज गडनीस | Updated: January 9, 2024 17:52 IST2024-01-09T17:51:25+5:302024-01-09T17:52:03+5:30
एक तास वगळता नियमित विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही.

तीन दिवस मुंबई विमानतळ एक तासासाठी बंद; भारतीय हवाई दलाचा सराव होणार
मुंबई - येत्या १२ ते १४ जानेवारी दरम्यान भारतीय हवाई दलातर्फे मरिन ड्राईव्ह येथे होणाऱ्या हवाई प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईविमानतळ व जुहू विमानतळ दुपारी १२ ते १ या एक तासाच्या कालावधीसाठी बंद राहणार आहे. या संदर्भात विमान कंपन्या, विमानतळ प्राधीकरण तसेच सर्व संबंधित घटकांना नोटिस जारी करत सूचित करण्यात आले आहे. हवाई दलाच्या या विशेष कार्यक्रमामुळे १२ हजार फूटांच्या खाली कोणत्याही विमान अथवा हेलिकॉप्टरला त्या कालावधीमध्ये उड्डाण करणे शक्य होणार नसल्यामुळे १२ ते १४ असे तीन दिवस एक तासासाठी विमानतळ बंद राहील. या कालावधीमध्ये कोणत्याही विमानाचे उड्डाण अथवा लँडिग होणार नाही. मात्र हा एक तास वगळता नियमित विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही.