Join us

मुंबईत अभय योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ – आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 20:32 IST

सध्या कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या मुंबईकरांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अभय योजनेला मुदतवाढ दिली आहे. अभय योजना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या मुंबईकरांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.आमदार सुनील प्रभू यांनी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विनंतीनुसार मुंबई महापालिकेने अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची मुदत आज १२ ऑगस्ट रोजी संपणार होती. मुंबई महापालिकेच्या पाणीबिलाच्या थकबाकीवर दरमहा २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाते. 

अभय योजनेअंतर्गत २ टक्के अतिरिक्त शुल्क माफ केले जाते. मुंबईकरांना आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाबद्दल मुंबई महापालिकेचे तसेच मुदतवाढ मिळण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार सुनील प्रभू यांचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आभार मानले आहेत. 

टॅग्स :आदित्य ठाकरे