Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: विधानभवनाबाहेर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:00 IST

Mumbai Shocking News: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज सकाळी विधानभवनाजवळ एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज सकाळी विधानभवनाजवळ एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला असून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी असलेले दादासो बबन कलसैत (वय, ३८) हे आज सकाळी विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. कोणालाही काही समजण्याच्या आतच, त्यांनी सोबत आणलेल्या डब्यातील रॉकेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. ते स्वतःला पेटवून घेण्याच्या तयारीत असतानाच, तिथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर झडप घातली. पोलिसांनी तातडीने त्यांच्या हातातील आगपेटी हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

पोलिसांनी कलसैत यांना ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेले. प्राथमिक चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, लोहार समाजाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे उभारलेला विश्वकर्माचा पुतळा नगरपंचायतीने अलीकडेच हटवण्यात आला. या कारवाईमुळे कलसैत प्रचंड नाराज होते. याच रागातून त्यांनी विधानभवनाबाहेर स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न केला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या प्रकरणी कलसैत यांच्याविरोधात कलम २२६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हाय-प्रोफाइल परिसरात ही घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Suicide Attempt Outside Legislature Foiled; Police Act Quickly

Web Summary : A man from Solapur tried self-immolation near Vidhan Bhavan due to anger over statue removal. Police intervened, preventing tragedy. He's been detained; investigation underway.
टॅग्स :विधान भवनमुंबईमुंबई पोलीस