सुरेश ठमके
दक्षिण मुंबईतील मुंबादेवी परिसरातील भुलेश्वर मार्केट हे अत्यंत गजबजलेले ठिकाण, दाटीवाटींची लोकवस्ती आणि अत्यंत अरुंद गल्ल्या, चिंचोळे रस्ते, यामुळे या परिसरात दिवसा कधीही गेलात तरी रस्ता शोधावा लागतो. अनधिकृत फेरीवाले आणि ग्राहकांमुळे भुलेश्वर मार्केट परिसरात रस्ताच दिसत नाही. पालिकेकडूनही फारशी कारवाई होत नसल्याने कुर्ला बस अपघाताच्या घटनेनंतर अचानक सुरू झालेली कारवाई का होते आहे? असा आश्चर्यजनक प्रश्न या फेरीवाल्यांकडून केला जात आहे.
चर्नी रोड आणि मरिन लाइन्स रेल्वे स्थानकांच्या पूर्वेला असलेल्या जुन्या मुंबीतील काळबादेवी आणि भुलेश्वर हा विभाग अत्यंत गजबलेला विभाग आहे. जुन्या उपकरप्राप्त इमारती या परिसरात आहेत. दोन इमारतींमध्येही अत्यंत कमी जागा आहे.
मुख्य म्हणजे या जुन्या वस्तीत कपड्यांचा बाजार, तांबा पितळेच्या भांड्यांचा बाजार, तोरणे, घरगुती वस्तू विशेष म्हणजे मुंबईतील सर्वात मोठा इमिटेशन दागिन्यांचा बाजार येथे आहे. त्यामुळे महिला ग्राहकांची सर्वात जास्त गर्दी या परिसरात दुपारपासूनच पाहायला मिळते. भुलेश्वर मार्केट आणि त्या समोरील रस्ता तर फेरीवाले आणि ग्राहकांनी व्यापून टाकलेला आहे.
भर दुपारीही या रस्त्यावर चालणे मुश्किल असते. तिथे वाहनांनी प्रवेश करणे तर अवघडच. त्यामुळे चर्नी रोड अथवा मरिन लाइन्स स्थानकाकडे जाणाऱ्या बेस्ट बस चालकांना नेहमी डोळ्यात तेल घालून बस चालवाव्या लागतात. बसेस वळवायलाच खूप वेळ जातो. असं चालकांचे म्हणणे आहे.
हातगाडीवालेही त्रस्त गर्दीमुळे हातगाड्यांद्वारे मालवाहतुकीशिवाय पर्याय नाही. मात्र गर्दी इतकी असते की हातगाडीवाल्यांनाही गाडी नेणे कठीण होते. ग्राहक, महिलेला चुकून हातगाडीचा धक्का लागला तर भांडण ठरलेले. आम्हाला हे रोजचे झाले आहे, असे हातगाडीवाले शिवराम प्रजापती म्हणतात.
फळ्या टाकून विक्रीतांबा गल्लीमध्ये खोदकाम केले आहे. खोदकाम सुरू असले तरी फेरीवाल्यांनी या खोदकामावरच फळ्या टाकून विक्रीला सुरुवात केली आहे. त्यामुळे कधीही अपघात घडण्याची शक्यता आहे. आधीच रस्ता अरुंद आहे. त्यात तो खोदल्याने आम्ही धंदा कुठे लावायचा? असा उलट सवाल कपडे विक्रेता विनोद सोलंकी करतो.
भुलेश्वर मार्केटसमोर आम्ही वर्षानुवर्षे व्यवसाय करत आहोत. मात्र, महापालिकेकडून कधी आमचे सामान जप्त करण्यात आले नाही. कधीतरी येऊन कर्मचारी आम्हाला दमदाटी करतात आणि निघून जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी कारवाई करू लागले आहेत. नेमके काय झाले आहे समजत नाही. - मनीषा खुमान, विक्रेती
भुलेश्वरच्या रस्त्यावर नेहमीच प्रचंड गर्दी असते. फेरीवाल्यांवर कारवाई करायची म्हटले तरी त्यासाठीही जागा उरत नाही. फेरीवाल्यांसमोर खरेदी करणाऱ्या महिलांची गर्दी असते. महिलांना धक्का लागू नये म्हणून काळजी घ्यावी लागते. त्यामुळे कारवाई कशी करायची? असा प्रश्न पडतो. -पालिका कर्मचारी