Join us

डीजी आले; सीएसएमटीवर आरपीएफ प्रकटले,

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 11:25 IST

Mumabi News: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) सोमवारी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे (आरपीएफ) महासंचालक (डीजी) मनोज यादव यांच्या भेटीनिमित्त संपूर्ण टर्मिनसवर आरपीएफचे जवान तैनात होते.

मुंबई - मध्य रेल्वेच्याछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) सोमवारी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे (आरपीएफ) महासंचालक (डीजी) मनोज यादव यांच्या भेटीनिमित्त संपूर्ण टर्मिनसवर आरपीएफचे जवान तैनात होते. एरवी सीएसएमटीवर प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असते. सोमवारी डीजी आले आणि सीएसएमटीवर आरपीएफ जवान प्रकटले, असे चित्र होते.  

डीजी यादव रविवारच्या टाटा मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. इतर दिवशी सीएसएमटी स्थानकामध्ये तुरळक प्रमाणात दिसणारे आरपीएफचे जवान शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत सीएसएमटी स्थानकात सोमवारी  जवानांचा फौजफाटा पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करीत होते. 

चित्र निर्माण करण्यात प्रशासन यशस्वीसीएसएमटी स्टेशनवर सोमवारी एवढा फौजफाटा कशासाठी तैनात करण्यात आला, याचे कोडे प्रवाशांना उलगडत नव्हते. काही प्रवाशांनी आरपीएफच्या जवानांना विचारल्यावर डीजी साहेब आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे दररोज आरपीएफ जवान दिसोत अथवा न दिसोत, डीजींच्यासमोर तरी स्थानकावर सुरक्षाव्यवस्था कडेकोट असल्याचे चित्र निर्माण करण्यात प्रशासन यशस्वी ठरले, अशी मार्मिक प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करीत होते.  

सीएसएमटीच्या प्रवेश द्वारावरील बॉडी स्कॅनर बंदमुंबई : मध्य रेल्वेच्याछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकावर असलेले बॉडी स्कॅनर बंद पडले असून, काही स्कॅनर धूळ खात पडले आहेत. तसेच बॅगेज स्कॅनर तर कुठेही नसल्याने प्रशासनाला टर्मिनसच्या सुरक्षेची काळजी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सीएसएमटी हे सर्वांत जास्त वर्दळ असलेले स्थानक आहे. या स्थानकावर दररोज सुमारे पाच लाख प्रवासी येतात. तसेच या स्थानकावरून रोज १८१० लोकल आणि टर्मिनसवरून दिवसाला सुमारे २०० पेक्षा अधिक एक्स्प्रेस सुटतात. सीएसएमटीवर एक्स्प्रेस पकडण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांचे तसेच इतर लोकांची वर्दळ असते. परंतु, या स्थानकात बॉडी स्कॅनर बंद पडले आहेत, तर बॅगेज स्कॅनर तर दृष्टिपथातच नाहीत. 

टॅग्स :भारतीय रेल्वेमुंबईमध्य रेल्वेछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस