मुंबई : मुलुंड येथे सोमवारी वृक्ष कोसळून एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. मात्र या वृक्षाची धोकादायक फांदी छाटल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. यामुळे संबंधित ठेकेदाराने वृक्ष छाटणीबाबत दिलेला अहवालच बोगस असल्याचा आरोप करीत त्याला काळ्या यादीत टाका, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला मंगळवारी केली.मुंबईतील रस्त्यांवर असलेले धोकादायक वृक्ष नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. गेल्या आठ महिन्यांमध्ये वृक्ष अंगावर कोसळल्यामुळे सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. मुलुंड येथील दुर्घटनेत एका रिक्षावर वृक्ष कोसळून दोन जण जखमी झाले. यामध्ये रिक्षा चालक अशोक शिंगरे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर प्रवासी राजेश भंडारी यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या वृक्षाच्या धोकादायक फांद्या पावसापूर्वी छाटल्या होत्या, असा दावा पालिका अधिकारी करीत आहेत.मात्र धोकादायक फांद्या छाटल्या होत्या तर वृक्ष कोसळले कसे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या दुर्घटनेमुळे मुंबईतील धोकादायक वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच मुंबईकरांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. वृक्षाच्या धोकादायक फांद्या तोडल्याचा अहवालच बोगस आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी सूचना जाधव यांनी प्रशासनाला केली आहे.जूनमधील काही दुर्घटना१४ जून २०१९ - ३८ वर्षीय शैलेश राठोड यांचा मालाड एस. व्ही. मार्गावर विजयकर वाडी येथे झाडाची फांदी पडून मृत्यू.१४ जून २०१९ - ४३ वर्षीय नितीन शिरवाळकर यांचा गोवंडीतील अणुशक्तीनगर येथे झाड पडून मृत्यू.१३ जून २०१९ - ३८ वर्षीय अनिल घोसाळकर हे जोगेश्वरी तक्षशीला को-आॅप. हाउसिंग सोसायटी येथे झाड पडून जखमी झाले. त्यानंतर दुसºया दिवशी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मुलुंड दुर्घटना; वृक्ष छाटणीचा ठेकेदाराने दिला बोगस अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 06:21 IST