बहुरंगी लढती ठरणार लक्षवेधी
By Admin | Updated: October 9, 2014 22:57 IST2014-10-09T22:57:52+5:302014-10-09T22:57:52+5:30
राज्यात विधानसभा निवडणुकीचा उरुस शिगेला पोहोचला आहे. मित्र पक्षांबरोबर असलेल्या युती, आघाड्या संपुष्टात आल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

बहुरंगी लढती ठरणार लक्षवेधी
मधुकर ठाकूर, उरण
राज्यात विधानसभा निवडणुकीचा उरुस शिगेला पोहोचला आहे. मित्र पक्षांबरोबर असलेल्या युती, आघाड्या संपुष्टात आल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांना आपली ताकद दाखविण्याची संधी मिळाली आहे.
जय-पराजयाची तमा न बाळगता सर्वच राजकीय पक्षांनी आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला आहे. उरण विधानसभा मतदारसंघही त्याला अपवाद नाही. स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या राजकीय पक्षांच्या निर्णयामुळे सर्वच पक्षातील इच्छुकांना निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. उरण विधानसभा मतदारसंघातही अपक्षांसह सर्वच राजकीय पक्ष मिळून २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बहुरंगी लढतीच्या निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. या बहुरंगी निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा सध्या लागून राहिल्या आहेत.
उरण विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर दुसरी निवडणूक होय. २००९ साली झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शेकापचे विवेक पाटील हे सेना भाजपाच्या पाठिंब्यावर निवडून आले होते. काँग्रेसच्या श्याम म्हात्रे यांना पराभवाची धूळ चारली होती. मात्र मागील लोकसभेच्या निवडणुकीपासून राजकीय चित्र बदलले आहे. शेकापने सेना भाजपशी फारकत घेत लोकसभेची निवडणूक लढविली. सेना भाजपाची साथ सोडलेल्या शेकापने पुन्हा उरणसाठी विवेक पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. स्वबळावर निवडणूक लढविणाऱ्या शेकापकडे कोणताही करिष्मा करणारा नेता नाही. त्यामुळे शेकापला पक्षांतर्गत मतभेदाबरोबरच मतदारांच्या नाराजीलाही सामोरे जावे लागेल. शेकापचा कट्टर राजकीय शत्रू काँग्रेसही स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे श्याम म्हात्रे यांना शेकापकडून पराभव पत्करावा लागला होता. यावेळी काँग्रेसची साथ राष्ट्रवादीने सोडली असल्याने काँगे्रसलाही या निवडणुकीत विजयासाठी पारंपरिक असलेल्या मतदारांवर अवलंबून रहावे लागणार आहे. महेंद्र घरत यांचा कामगार आणि समाजात बऱ्यापैकी दबदबा आहे. समाजसेवेचा आणि कामगार क्षेत्रातील अनुभवाच्या शिदोरीवर घरत यांनी मागील दोन वर्षांपासून विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली होती. राष्ट्रवादीची साथ नसल्याने काँग्रेस पक्ष, कामगार क्षेत्रातील कामगिरी आणि समाजसेवेच्या बळावर महेंद्र घरत जिंकण्याच्या इर्षेने निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. त्यांचे मार्गदर्शक रामशेठ ठाकूर मात्र काँग्रेस सोडून भाजपात गेल्यानंतरही निष्ठेने महेंद्र घरत काँग्रेसमध्येच राहिले.
प्रतिस्पर्धी उमेदवारांना धडकी भरविण्याची ताकद असलेल्या महेंद्र घरतांकडे बलाढ्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. महायुतीशी फारकत झाल्यावर शिवसेनेने स्वबळावर निवडणुकीचा निर्णय घेत उरण मतदारसंघात नव्या दमाच्या, कार्यकुशल, कार्यतत्पर आणि प्रामाणिक मनोहर भोईर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सेनेचे रायगड जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजिपचे विद्यमान सदस्य मनोहरशेठ भोईर यांनी जि.प.चे उपाध्यक्षपद, बांधकाम सभापतीपद, प्रतोद अशी पदे भूषविली आहेत.