अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई -
दिवाळी झाली की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजतील. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विभागवार बैठका घेत आहेत. नाशिक येथे नुकतीच त्यांनी बैठक घेतली. “ज्या ठिकाणी पक्षाचे बळ असेल तिथे महायुतीतल्या घटक पक्षांसोबत मैत्रीपूर्ण लढत होईल. जिथे विरोधक प्रबळ असतील, त्या ठिकाणी महायुती म्हणून आपण लढू,” अशी भूमिका फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. पुण्यामध्ये बोलताना त्यांनी, कुठलाही स्ट्राँग कार्यकर्ता आला, तर त्याला भाजपमध्ये घेण्याची आमची भूमिका आहे, असे सांगितले. भाजपमध्ये आमचे जे कार्यकर्ते आहेत, ते बाहेरून येणाऱ्या लोकांना सामावून घेतात, त्यामुळे भाजप मोठा झाला आहे. एखाद्या ठिकाणी काही नाराजी जरी असली, तरी आम्ही समजावतो आणि आमचे लोक समजून देखील घेतात, असेही ते म्हणाले.
फडणवीस यांच्या या विधानाने उद्धवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यापेक्षा जास्त चिंता शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर पुढची तीन वर्षे राज्यात कुठलीही निवडणूक नाही. त्यामुळे पक्ष वाढीसाठी जे काही करायचे ते आज आणि आत्ताच करावे लागेल, हे समजण्याइतके फडणवीस चाणाक्ष आहेत. शिवाय या निवडणुकीतच स्थानिक पातळीवर भाजपचे संख्याबळ वाढले, म्हणजे विरोधकांचे बळ आपोआप कमी होईल. ‘कुठलाही स्ट्राँग नेता’ याचा अर्थ शिंदेसेनेतला एखादा स्ट्राँग नेता भाजपमध्ये येऊ इच्छित असेल, तर त्यासाठीही भाजपने भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप वगळता इतर अनेक पक्षांतल्या नेत्यांना भाजपने आपल्यासाठी दार उघडावे, असे सतत वाटत आहे. त्यामुळे ही धोक्याची घंटा विरोधकांपेक्षा महायुतीतील घटक पक्षांसाठी जास्त आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबई, ठाण्यात फारसे बळ नाही. काँग्रेसकडे नेते नसले, तरी काँग्रेसचा पारंपरिक मतदार त्यांच्या सोबत असतोच. उद्धव ठाकरे यांची ताकद किती आहे, यापेक्षा राज आणि उद्धव दोघे एकत्र आले, तर त्यातून तयार होणाऱ्या परसेप्शनमुळे चित्र बदलू शकते, असे त्या दोघांना वाटते. तसेही राज आणि उद्धव यांच्याकडे गमावण्यासारखे आज काहीही नाही. जे काही मिळेल ती त्यांची शंभर टक्के कमाईच असेल. उद्या वेळ पडली, तर राज आणि उद्धव ठाकरेंचे नगरसेवक भाजपसोबत जायला कमी करणार नाहीत. त्यातही फायदा भाजपचाच असेल. मुंबईत शिंदेसेनेची म्हणावी तशी ताकद नाही. ठाणे, नवी मुंबईत भाजपला शिंदेसेना नकोच आहे. कल्याण-डोंबिवलीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असल्यामुळे तेथे त्यांना स्वतःची ताकद वाढवण्याची एवढी चांगली संधी पुन्हा मिळणार नाही. त्यामुळेच शिंदेसेनेला जरी महायुती म्हणून लढायचे असले, तरी आज भाजपची ती गरज राहिलेली नाही. मुंबईच्या २२७ पैकी १६० ते १७५ जागा कोणत्याही परिस्थितीत आपण लढवायच्या, असा निर्धार भाजपने केला आहे. महायुतीचाच महापौर असेल, असे मुंबई अध्यक्ष अमित साटम सांगत असले, तरी भाजपचाच महापौर असेल हे भाजपने पक्के केले आहे. स्थायी समिती अध्यक्षपदही भाजप स्वतःकडेच ठेवण्याच्या तयारीने मैदानात उतरत आहे. त्यामुळे शिंदेसेनेला स्वतःचे अस्तित्व मुंबईत टिकवायचे असेल, तर भाजप देईल तेवढ्या जागा घेऊन शांत बसण्यापलीकडे आज तरी त्यांच्या हातात काहीही नाही. राज ठाकरे शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्या सोबत येतील, असे शिंदेसेनेचे अनेक नेते खासगीत सांगतात. एवढा कॉन्फिडन्स शिंदेसेनेच्या नेत्यांकडे येतो कुठून, हा प्रश्नच आहे. बाळासाहेबांचा पक्ष आणि चिन्ह ज्यांनी नेले, स्वतःच्या मुलाला ज्यांच्यामुळे विधानसभेत पराभव पत्करावा लागला, त्या शिंदेसेनेसोबत राज का जातील, या प्रश्नावर त्या नेत्यांकडे उत्तर नसते. २०२९ ची विधानसभा आणि लोकसभा भाजप स्वबळावर लढेल, असे या आधीच ज्येष्ठ नेत्यांनी सांगून टाकले आहे. त्यासाठी जी पेरणी करावी लागेल, ती फडणवीस मजबूतपणे करू पाहत आहेत. संघावर विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या पक्षाला मतदान करण्याच्या मानसिकतेत नाही. भाजपने स्वबळावर लढावे, म्हणजे आम्हाला मोकळेपणाने भाजपसाठी काम करता येईल, अशी संघ नेत्यांची भावना आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आता मित्रपक्ष शोधत नाहीत, तर ते इतर पक्षांतल्या मित्रांसाठी स्वपक्षात जागा शोधत आहेत, असे म्हटले, तर वावगे होणार नाही. फडणवीसांनी आखलेली ही रणनिती केवळ स्थानिक निवडणुकीपुरती नाही. स्थानिक संस्थांमधील भाजपचे वर्चस्व हेच २०२९ च्या निवडणुकांसाठीचे खरे ‘ग्राउंडवर्क’ ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ नगरपालिका किंवा जिल्हा परिषदांची निवडणूक म्हणून नव्हे, तर महाराष्ट्राचा पुढील राजकीय नकाशा ठरवणाऱ्या निवडणुका म्हणून भाजप आणि संघ पाहत आहे. १४ नोव्हेंबरला बिहारचा निकाल लागेल. त्याच दरम्यान धनुष्यबाण कोणाचा या खटल्याची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू होईल. त्याचा निकालही भाजपला महाराष्ट्रात नेमके काय हवे आहे, हे सांगणारा असेल. बिहारचा निकाल आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा निकाल या तारखांची संगत, हा राजकीय योगायोग म्हणायचा की आणखी काही हे ज्याचे त्याने ठरवावे...
Web Summary : BJP aims to dominate local elections, potentially sidelining allies like Shinde's Sena. Focus is on strengthening the party for future solo contests, leveraging support from other parties and the RSS. The outcome of the 'bow and arrow' case will significantly impact BJP's strategy.
Web Summary : भाजपा का लक्ष्य स्थानीय चुनावों में वर्चस्व स्थापित करना है, जिससे शिंदे सेना जैसे सहयोगी दल हाशिये पर जा सकते हैं। भविष्य में अकेले चुनाव लड़ने के लिए पार्टी को मजबूत करने, अन्य दलों और आरएसएस से समर्थन प्राप्त करने पर ध्यान केंद्रित किया जा रहा है। 'धनुष और बाण' मामले का परिणाम भाजपा की रणनीति को महत्वपूर्ण रूप से प्रभावित करेगा।