Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांनो, पाणी उकळून-गाळून प्या! काही विभागात पुढील २४ तास गढूळ पाण्याची शक्यता

By जयंत होवाळ | Updated: December 7, 2023 20:34 IST

खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ए, सी, डी, जी उत्तर, जी दक्षिण विभागातील नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. मलबार हिल  जलाशय पुनर्बांधणी संदर्भात पाहणीसाठी शहर विभागात काही परिसरात पाणीकपात, तर काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामध्ये ए, सी, डी, जी उत्तर, जी दक्षिण विभागांचा समावेश होता. जलाशयातील कप्पा पूर्ण रिक्त करुन पुन्हा भरण्यात आला आहे. त्यामुळे काही भागातील  नागरिकांना २४ तास गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.

 मलबार जलाशयाची  पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टीने मुंबई आय. आय. टी.चे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ समितीने मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक २ अ आणि २ ब ची गुरुवारी अंतर्गत पाहणी केली. या पाहणीसाठी जलाशयाचा कप्पा क्रमांक २ रिक्त करण्यात आला होता. त्यामुळे दिवसभत शहर भागात पाणी टंचाई होती. पुनर्रबांधणीच्या    प्रस्तावाचे पुनरावलोकन करुन या समितीने योग्य कार्यपद्धती सुचविणे अपेक्षित आहे.  

समितीने सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत पाहणी केली. उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर यांच्यासह अभियंता आणि नागरिकांचे प्रतिनिधी डॉ. वासुदेव नोरी, अभियंता आणि नागरिकांच्या प्रतिनिधी अल्पा सेठ, आयआयटी मुंबईचे प्राध्यापक आर. एस. जांगीद, प्राध्यापक ज्योती प्रकाश, प्राध्यापक दसका मूर्ती यांचा समितीत समावेश आहे. आगामी दिवसात जलाशयाच्या उर्वरीत भागाची पाहणी केली जाणार आहे.

टॅग्स :पाणीमुंबई