६९० ठिकाणी डासांच्या अळ्या
By Admin | Updated: June 20, 2016 02:46 IST2016-06-20T02:46:42+5:302016-06-20T02:46:42+5:30
डेंग्यू, मलेरिया रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी १ जानेवारी ते ३१ मे २०१६ या पाच महिन्यांच्या कालावधीत डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने विविध

६९० ठिकाणी डासांच्या अळ्या
मुंबई : डेंग्यू, मलेरिया रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी १ जानेवारी ते ३१ मे २०१६ या पाच महिन्यांच्या कालावधीत डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने विविध परिसरातील घरांलगतच्या परिसराची तपासणी महापालिकेद्वारे करण्यात आली. याअंतर्गत ३९ लाख ८७ हजार ३८७ घरांना भेटी देण्यात आल्या असून, ६९० ठिकाणी मलेरिया वाहक अॅनॉफिलीस डासांच्या अळ्या आढळून आल्या. तर १ हजार ९६९ ठिकाणी एडिस एजिप्ताय या डेंग्यू प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्या आढळून आल्या. ही सर्व उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली असून, संबंधितांकडून ९ लाख २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रात विविध रोगांवर नियंत्रण असावे व रोगांच्या प्रसाराला प्रतिबंध व्हावा म्हणून सार्वजनिक आरोग्य खाते, कीटकनाशक खाते यासारखे विविध विभाग कार्यरत आहेत. औषध फवारणी, धूम्रफवारणी, डासांची उत्पत्तीस्थाने शोधून ती नष्ट करणे यासारख्या विविध उपाययोजना महापालिकेद्वारे नियमितपणे करण्यात येत आहेत. याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून ही तपासणी मोहीम आणि कारवाई करण्यात आली. महापालिकेकडून उपलब्ध माहितीनुसार, डेंग्यू विषाणूवाहक डासांच्या अळ्या फेंगशुई झाड, बांबू प्लॅन्ट्स, मनीप्लँट्स यासारखी शोभिवंत झाडे; घराच्या सज्जामध्ये (गॅलरी) किंवा सभोवताली झाडांच्या कुंड्यांमधील अतिरिक्त पाणी जमा होण्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या ताटल्या (प्लेट्स), वातानुकूलन यंत्रणा, रेफ्रिजरेटर यासारख्या स्वच्छ पाण्यात आढळून आल्या आहेत. (प्रतिनिधी)