मुंबई: जागतिक तापमानवाढ, त्यामुळे वितळू लागलेला बर्फ, पाण्याची वाढू लागलेली पातळी यामुळे लवकरच जगातली अनेक शहरं पाण्याखाली जाणार आहेत. काही महिन्यांपूर्वी आलेल्या संशोधनात याबद्दलचा धोका व्यक्त करण्यात आला होता. मात्र नव्या संशोधनात शहरं पाण्याखाली जाण्याची प्रक्रिया आधीपेक्षा जास्त वेगानं होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये मुंबईचादेखील समावेश आहे.समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यानं येत्या काळात अनेक शहरं जगाच्या नकाशावरून गायब होतील, अशी भीती याआधीही व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता समोर आलेल्या माहितीला उपग्रहातून घेतलेल्या फोटोंच्या आधार आहे. यानुसार 2050 पर्यंत जगातली बरीचशी शहरं पाण्याखाली गेलेली असतील. या भागावर सध्या 15 कोटी लोक वास्तव्यास आहेत. आधी सात बेटांवर वसलेल्या, त्यानंतर भराव टाकून एकत्र करण्यात आलेल्या मुंबईलादेखील पाण्याच्या वाढत्या पातळीचा फटका बसणार आहे.
पुढे धोका आहे! 2050 मध्ये मुंबई 'अशी' दिसणार; बराचसा भाग बुडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 13:57 IST