Join us

एमपीएससीची स्पर्धा परीक्षा यापुढे वर्णनात्मकच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 09:46 IST

पदभरती परीक्षांमध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवल्या जाणाऱ्या पदभरती परीक्षांमध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापुढे  राज्यसेवेसह सर्व राजपत्रित  अ आणि ब गटातील संवर्गाच्या पदभरतीकरिता वेगवेगळ्या पदांसाठीच्या परीक्षा कमी करून यापुढे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ही एकच परीक्षा घेतली जाणार असून, या निर्णयाची अंमलबजावणी २०२३ पासून करण्यात येणार आहे.

एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सोमवारी ही माहिती दिली. या शिवाय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट अ आणि गट ब संवर्गाकरिता यापुढे वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे निवड करण्यात येतील.

राजपत्रित गट अ आणि गट ब या संवर्गांसाठी आणि अराजपत्रित गट ब, गट क या संवर्गांसाठी दोन स्वतंत्र पूर्व परीक्षा घेण्यासह परीक्षा योजनेमध्येही बदल करण्यात आला. राजपत्रित संयुक्त परीक्षा आणि अराजपत्रित संयुक्त परीक्षा या दोन्ही परीक्षांसाठी उमेदवारांकडून अर्ज घेताना जाहिरातीतील सर्व संवर्गांसाठी पात्रतेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेतला जाईल. संबंधित संवर्गासाठी उमेदवाराने दिलेला विकल्प संबंधित संवर्गातील पदभरतीसाठीचा अर्ज समजला जाईल तसेच भरल्या जाणाऱ्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करायच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गासाठी पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या विविध संवर्गांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या, वेतनश्रेणी, दर्जा आदी बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षा या नावाने स्वतंत्र परीक्षा घेतल्या जातील.

‘पीएसआय’साठी ७० गुण अर्हताकारीपोलीस उपनिरीक्षक संवर्गातील निवडीसाठी शारीरिक चाचणी ७० गुणांची अर्हताकारी करण्याचा निर्णयही घेण्यात आला. पूर्वी चाचणी ६० गुणांसाठी अर्हताकारी होती. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येईल.

टॅग्स :एमपीएससी परीक्षामुंबई