Join us  

'संभाजीराजे अर्धवट बोलले, याचा मला खेद वाटतो'; विजय वडेट्टीवारांनी दिलं स्पष्टीकरण

By मुकेश चव्हाण | Published: October 10, 2020 3:54 PM

राजांची भूमिका एककल्ली असू नये. ते छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. 

मुंबई: मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. यात आता खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तुम्ही ओबीसीत का येत नाही?', अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केल्याचा दावा संभाजीराजे यांनी केला होता. संभाजीराजेंच्या या दाव्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

'एबीपी माझा'च्या वृत्तानूसार, विजय वडेट्टीवार म्हणाले की, "माझ्या वक्तव्याचा अर्थ संभाजीराजेंनी काय घेतला किंवा त्यांची काय गफलत झाली, हे माहित नाही. माझं वक्तव्य, माझं बोलणं स्पष्ट होतं. आम्ही मराठा समाजातील गरीब मुलांच्या नुकसानीच्या आड येत नाही आणि येण्याचा विषयच नाही, असं आम्ही वारंवार सांगितलं होतं. महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांच्या दिमतीला बहुजन समाजच होता. राजांची भूमिका एककल्ली असू नये. ते छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. 

आमची भूमिका ही मराठ्यांच्या, मराठा समाजाच्याविरोधात आहे, असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला. त्यावर माझी प्रतिक्रिया अशी होती की, आम्हाला आमच्या आरक्षणाला धक्का न पोहोचता तुम्हाला ओबीसीत यायचं असेल तर वेगळं मागा, त्याचा संवर्ग वेगळा करा, असं स्पष्टपणे मी महाराजांशी बोललो. पण महाराज अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत त्यामुळे मला खेद वाटतो, असं विजय वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

मी ओबीसीचं काम करणारा कार्यकर्ता, ओबीसी समाजात जन्मलेला आणि ओबीसीसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. ओबीसी समाजाचं वाईट होऊ देणार नाही. ओबीसी समाजासाठी मी लढेन, मला मंत्रिपद महत्त्वाचं नाही. समाज खितपत पडला आहे, त्याला न्यायाची गरज आहे, ती लढाई मी लढणार आहे," असं देखील विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

नेमकं संभाजीराजे काय म्हणाले होते?

विजय वडेट्टीवार यांच्यामुळे मी फार दुःखी आहे. ओबीसी मधून आरक्षण नको हे मी अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे.  विजय वडेट्टीवार मला म्हणाले होते की ओबीसी मधून आरक्षण देण्यास तयार आहे. मी म्हणालो कृपया असे करू नका.  विजय वडेट्टीवार असं का वागत आहेत माहिती नाही, असं संभाजीराजे यांनी सांगितले. तसेच मी कधीही तलवार काढू असे म्हटले नाही. सारथी विषयी आणि माझ्याविषयी विजय वडेट्टीवारांना आकस आहे. तोच पुन्हा बाहेर येतोय. महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सूरू आहे. त्यात सत्ताधारी पक्षातली काही मंडळी आहेत. माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा  अर्थ काढला. विजय वडेट्टीवार मला एक बोलले आणि आता दुसरं बोलतायत, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. त्यांनी असं करू नये, त्यांनी माझं संपूर्ण भाषण ऐकावं, असं संभाजीराजे यांनी म्हटले होते.

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीविजय वडेट्टीवारमराठा आरक्षणमहाराष्ट्र सरकारओबीसी आरक्षण