Join us  

खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 11:21 AM

कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सातव यांच्या तब्येतीची जहांगिरमध्ये जाऊन विचारपूस केली. तसेच, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेत माध्यमांनाही माहिती दिली होती

मुंबई - काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांची तब्येत खालावली होती. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पुण्यातील जहांगिर रूग्णालयात सातव यांच्यावर उपचार होत असून आता त्यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. सध्या त्यांच्यावर सामान्य वॉर्डमध्ये देखरेखीखाली उपचार करण्यात येत आहेत. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली.

कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सातव यांच्या तब्येतीची जहांगिरमध्ये जाऊन विचारपूस केली. तसेच, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेत माध्यमांनाही माहिती दिली होती. काँग्रेस खासदार राजीव सातव यांना 19 एप्रिलला कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली होती. 22 तारखेला त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांना 25 तारखेला जहांगिरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आता त्यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. 

सातव कोरोनाबाधित झाल्याने त्यांना 25 एप्रिलला उपचारासाठी जहांगिरमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी, त्यांना अति दक्षता विभागात ठेवण्यात आले होते. आता, त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली असून त्यांना व्हेंटीलेटरशिवाय श्वास घेता येत आहे, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. 

सोनिया गांधी, राहुल गांधी, मुख्यमंत्र्यांनी केली होती विचारपूस....

खासदार राजीव सातव यांच्या तब्येतीबाबत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेते नजर ठेऊन होते. त्यांच्याकडून सतत फोनच्या माध्यमातून सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात येत होती. त्यामुळे, डॉक्टरांचेही त्यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष होते.  

टॅग्स :राजीव सातवकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसपुणे