Join us  

अन् नवनीत राणा यांना रडू कोसळलं....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 6:33 AM

राणा दाम्पत्य अखेर तुरुंगाबाहेर, नवनीत राणा थेट लीलावती रुग्णालयात दाखल 

मुंबई : मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यावरून झालेल्या वादानंतर समाजात तेढ आणि शांतता भंग केल्याबरोबरच राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा  आणि त्यांचे पती आमदार रवी राणा गुरुवारी अखेर कारागृहाबाहेर पडले. मानदुखीचा त्रास जाणवत असल्याने नवनीत राणा या थेट लीलावती रुग्णालयाकडे रवाना झाल्या. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

राणा दाम्पत्याला बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला होता. पण न्यायालयाच्या आदेशाची प्रत साडेपाच वाजेपर्यंत कारागृहात न पोहोचल्यामुळे त्यांना बुधवारची रात्रही कारागृहात काढावी लागली. नवनीत यांना भायखळा कारागृहात, तर रवी राणा यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. नवनीत राणा यांना मणका आणि कंबरदुखीसह स्पॉन्डिलायसिसचात्रास आहे. त्यात न्यायालयीन कोठडीमध्ये असताना जमिनीवरबसावे आणि झोपावे लागत असल्यामुळे त्रास वाढल्याची तक्रार त्यांनी केली. 

... आणि रडू कोसळलेमानदुखीचा त्रास जाणवत असल्याने नवनीत राणा यांना थेट लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. आमदार रवी राणा यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली तेव्हा नवनीत यांना रडू कोसळले.

शिवसेना कार्यालयात युवा स्वाभिमानकडून तोडफोडअमरावती : आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना ११ दिवसांनंतर जामीन मिळाल्याच्या आनंदात युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री राजापेठ येथील शिवसेना कार्यालयात खुर्च्यांची तोडफोड केली. त्यानंतर राणांचा जयघोष करून शिवसेनेविरुद्ध घोषणाबाजी केली. युवा स्वाभिमानच्या काही कार्यकर्त्यांविरुद्ध भादंविचे कलम ४५२, १४३, १४७, १४८, १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अभिजीत देशमुख, अनुप अग्रवाल, अनिकेत देशमुख, मंगेश कोकाटे,  सत्यम राऊत यांना अटक करण्यात आली. राणा दाम्पत्याच्या सुटकेमुळे पुन्हा एकदा युवा स्वाभिमान पक्ष व शिवसैनिक अशी धुमश्चक्री उडाली आहे. दरम्यान, युवा स्वाभिमानचे हल्लेखोर कार्यालय पेटविण्याच्या हेतूने पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आले होते, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

टॅग्स :नवनीत कौर राणारवी राणा