Join us  

मालाडच्या रेल्वे पटरीवरून झोपडपट्टी हटविण्याच्या विरोधात खासदार उतरले पटरीवर!

By मनोहर कुंभेजकर | Published: October 06, 2022 8:16 PM

मालाडच्या रेल्वे पटरीवरून झोपडपट्टी हटविण्याच्या विरोधात खासदार गोपाळ शेट्टी यांनी आंदोलन केले. 

मुंबई : आज सकाळी मालाड येथील रेल्वे विकास कार्याचा आरंभ करताना रेल्वे पटरीच्या किनाऱ्यावरून झोपडपट्टी हटविण्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले. यावेळी उत्तर मुंबई भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी धाव घेतली. विकास कार्य करताना गोर गरिबांना न्याय मिळविण्यासाठी व येथील झोपडपट्टीवासियांना पर्यायी घर मिळण्यासाठी त्यांनी पटरीवर उतरून आंदोलन केले. यावेळी त्यांच्या सोबत शेकडो भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आणि येथील नागरिक उपस्थित होते. मालाड येथील रेल्वे जमिनीवर असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना विषयी चर्चा त्यांनी अधिकारी आणि येथील नागरिकांसोबत चर्चा केली. विकास कार्य करताना पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. गोरगरिबांना उध्वस्त करून विकास कार्य करावे ते योग्य नाही अशी भूमिका त्यांनी मांडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक झोपडपट्टीवासियांना पर्यायी घर सरकारने द्यावे अशी भूमिका असून सरकारी अधिकारी हे विसरतात आणि पर्यायी जागेचा बंदोबस्त न करता अचानक येऊन झोपडपट्टी तोडायला सुरू केली याबद्धल त्यांनी नापसंती व्यक्त केली. खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारने आवास योजना जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या जमिनीवर असलेल्या झोपडपट्टीवासियांना पर्यायी घर मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदा केला आहे. रेल्वेचे अधिकारी पंतप्रधानांच्या आदेशाचे पालन करत नाही. अश्या मुजोर अधिकाऱ्यांना आपण विरोध करणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

विकास कार्य करतांना त्या जमिनीवर असलेले बाधित होणाऱ्या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन योग्य रीतीने पद्धतीने व्हावे एवढेच आपले म्हणणे आहे. विकास कार्य झालेच पाहिजे. रेल्वे रुळांचा येत्या काळात विस्तार करण्यासाठी येथील झोपडपट्टी दूर करावीच लागेल. मालाड रेल्वे जमिनीवर असलेल्या झोपडपट्टीवासी लोकांकडे १९९० चे सर्व सरकारी पुरावे आहेत. रेल्वे अधिकारी, केंद्र सरकारचे अधिकारी आणि राज्य सरकारचे अधिकारी, संबंधित मंत्र्यांची लवकर संयुक्त बैठक लावा असे पत्र आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लिहिल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वे रुळ वाढवायचे काम मार्च पर्यंत पूर्ण करायचे असेल तर आज ऑक्टोबर पासून मार्चपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. या वेळात पर्यायी व्यवस्था करून रेल्वे विकास कार्य करावे हाच आपला मुद्दा आहे. रेल्वे पटरी क्रॉस करतांना नागरिकांचा लोक रेल्वे  अपघातात मृत पावतात. वर्षाला जवळपास तीन हजार नागरिक रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडतात, त्यासाठी आपण वारंवार आवाज उठवला आहे. रेल्वे रुळाची सहावी लाईन कार्य पूर्ण व्हावे यासाठी उपक्रम राबवतांना त्याच सोबत विस्थापित होणाऱ्या नागरिकांवर ही अन्याय होता कामा नये असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :गोपाळ शेट्टीरेल्वेभाजपा