खासदार निधीचा व्हीआयपींसाठी वापर
By Admin | Updated: July 5, 2014 04:18 IST2014-07-05T04:18:48+5:302014-07-05T04:18:48+5:30
माजी खासदार संजीव नाईक यांच्या निधीतून वंडर पार्कमध्ये स्वागत कक्षाची उभारणी करण्यात आली आहे

खासदार निधीचा व्हीआयपींसाठी वापर
नामदेव मोरे, नवी मुंबई
माजी खासदार संजीव नाईक यांच्या निधीतून वंडर पार्कमध्ये स्वागत कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. या टुमदार बंगल्याचा वापर फक्त व्हीआयपींसाठीच केला जात आहे. सामान्य नागरिकांना त्याचा काहीही उपयोग होत नाही.
ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक यांचा खासदार निधी हा नेहमीच वादाचा विषय बनला आहे. सुरुवातीच्या दोन वर्षांत निधीचा वापरच न केल्याचा आरोप त्यांच्यावर विरोधकांनी केला होता. परंतु जनहिताचे मोठे काम करण्यासाठी निधी साठविल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. नवी मुंबईमध्ये सर्वात मोठ्या वंडर पार्कसाठी निधी खर्च करण्यात आला आहे. पार्कमध्ये लावलेल्या उद्घाटनाच्या पाटीवर महापालिका व खासदार यांच्या स्थानिक विकास निधीतून संयुक्तपणे हा प्रकल्प राबविल्याचे लिहिले आहे. नाईक यांनी अत्यंत चांगल्या उपक्रमासाठी निधीचा वापर केल्यामुळे त्यांचे अनेकांनी कौतुकही केले आहे. निवडणुकीपूर्वी प्रकाशित केलेल्या कार्य अहवालामध्येही शहरात वंडर पार्क उभारल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
खासदार निधीच्या कामाविषयी माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहितीतून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नवी मुंबई महापालिकेने वंडर पार्कसाठी जवळपास ३५ कोटी रुपये खर्च केले आहेत. येथे खासदार निधी मात्र फक्त ९६ लाख ५ हजार एवढाच वापरण्यात आला आहे. या निधीच्या मोठ्या भागातून या ठिकाणी स्वागत कक्ष उभारण्यात आले आहे. अॅम्पी थिएटरमधील आॅडिओ सिस्टीम व पब्लिक अॅड्रेस यंत्रणा बसविण्यात आली आहे. सर्वात जास्त निधी स्वागत कक्षावर खर्च झाला असून, त्याचा सामान्य नागरिकांना अजिबात लाभ होत नाही.
पार्कच्या कोपऱ्यात हा टुमदार बंगला उभा राहिला आहे. येथे येणाऱ्या व्हीआयपींसाठी तेथे वातानुकूलित यंत्रणा व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांना या ठिकाणी फिरकूही दिले जात नसून खासदार निधी फुकट गेल्याची चर्चा होत आहे. संजीव नाईकांशी याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला, परंतु संपर्क झाला नाही. उद्यान विभागाचे प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत
तायडे यांनीही खासदार निधीतून स्वागत कक्ष, आॅडिओ सिस्टीम व पब्लिक अॅड्रेस सिस्टीमचे काम
केले असल्याबाबत दुजोरा दिला
आहे.