Join us

मराठी तरुणांना जर्मन भाषा प्रशिक्षणाच्या हालचाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 09:34 IST

‘मराठी तरुणांचे जर्मन भाषा प्रशिक्षण रोजगाराचे स्वप्न लांबले’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये २ जुलै रोजी प्रसिद्ध झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील मराठी तरुणांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन जर्मनीत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांना शासनाने कौशल्य विकास व जर्मन भाषा प्रशिक्षणासंदर्भात झालेल्या कराराच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अभ्यास दौऱ्यासाठी मंजुरी दिली आहे. ११ जुलैला शिक्षण विभागाने याबाबत निर्णय प्रसिद्ध केला आहे. 

‘मराठी तरुणांचे जर्मन भाषा प्रशिक्षण रोजगाराचे स्वप्न लांबले’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये २ जुलै रोजी प्रसिद्ध झाले होते. मराठी युवकांना जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जाईल, असे शासनाने जाहीर केले होते. मात्र, वर्षभर उलटूनही प्रशिक्षण सुरू झाले नव्हते. त्यामुळे ज्या तरुणांनी यासाठी नोंदणी केली होती, त्यांनी या संधीबाबत आणि प्रशिक्षण वर्ग सुरू होणार की नाही; याविषयी प्रश्न उपस्थित केले होते.

दीपक केसरकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र या वृत्तानंतर माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून जर्मन भाषेचे प्रशिक्षण व रोजगारासाठीची प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावी, तसेच या प्रकल्पासाठी काम करण्यास आपण तयार असल्याचे नमूद केले आहे. त्यानंतर शिक्षण विभागाने दक्षिण व आग्नेय आशियातील कुशल कामगारांच्या भरतीसह परदेशी भाषा म्हणून जर्मन भाषेच्या एकत्रीकरणावरील अभ्यासासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्या अभ्यास दौऱ्यास सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे.

१३ जुलैपासून दौरा या दौऱ्यात जर्मनीतील ओटेनबर्ग येथे कौशल्य आधारित स्थलांतर (स्कील मायग्रेशन) बाबत झालेल्या कराराच्या अंमलबजावणीस गती देण्याच्या दृष्टीने राहुल रेखावार हे शासनाची भूमिका बजावणार आहेत. हा अभ्यास दौरा दि.१३ ते १९ जुलै २०२५ या कालावधीत होणार असल्याचेही शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :जर्मनी