संवेदनशील भागात पोलिसांचे संचलन
By Admin | Updated: October 15, 2014 04:48 IST2014-10-15T04:48:59+5:302014-10-15T04:48:59+5:30
मतदानाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी शहरातल्या सामाजिक व राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघांमध्ये संचलन करून आपली सज्जता दाखवून दिली.

संवेदनशील भागात पोलिसांचे संचलन
मुंबई : मतदानाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी शहरातल्या सामाजिक व राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघांमध्ये संचलन करून आपली सज्जता दाखवून दिली. उद्या मतदानापासून मतमोजणीपर्यंतची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, या प्रक्रियेला कोणत्याही अनुचित घटनेने गालबोट लागू नये, कोणत्याही प्रकारचे दडपण न येता मतदारांनी निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावावा यासाठी पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
मुंबई पोलिसांनी आचारसंहिता लागल्या लागल्याच शहरातील ३६ मतदारसंघांची धार्मिक आणि राजकीयदृष्ट्या चाचपणी सुरू केली होती. त्यातच युती-आघाडी फुटल्याने पाच प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले. पूर्वी मराठीबहुल मतदारसंघात सेना-मनसे यांच्यातील संभाव्य राडे लक्षात घेऊन ते मतदारसंघ किंवा परिसर संवेदनशील ठरे. मात्र यात भाजपा-सेना, सेना-मनसे, सेना-राष्ट्रवादी, काँग्रेस-राष्ट्रवादी अशा दोन पक्षांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघांची भर पडली. यापैकी ३८ मतदान केंद्रे पोलिसांनी संवेदनशील जाहीर केली. भांडुप, विक्रोळी, घाटकोपर पश्चिम, अणुशक्ती नगर, दादर, कलिना, कुर्ला, मानखुर्द-शिवाजीनगर, सायन कोळीवाडा, बोरीवली, दिंडोशी, गोरेगाव, वांद्रे पूर्व आणि शहरातील काही मतदारसंघांचा समावेश आहे.
मतदानाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी संवेदनशील मतदारसंघांत संचलन केले. या संचलनात उपायुक्त, संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि बाहेरून मागविलेली निमलष्करी दलांची अतिरिक्त कुमक सहभागी होती. केंद्रीय व राज्य राखीव दलाच्या तुकड्या, होमगार्ड्स, दंगल नियंत्रण पथकातील जवानांना त्या त्या मतदारसंघाची भौगोलिक रचना कळावी, पोलिसांचे मनोबल आणखी दृढ व्हावे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे असामाजिक घटक, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या मनात पोलिसांचा धाक निर्माण व्हावा, ही या संचलनामागील प्रमुख उद्दिष्टे आहेत. (प्रतिनिधी)